नेपाळी रुग्णाला मायदेशी पोहचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:16 AM2019-06-27T00:16:45+5:302019-06-27T00:20:25+5:30
नेपाळ येथील एका व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार केल्यावर त्यास त्याच्या मूळ स्थानी (नेपाळ) येथे सोडून देण्याचे प्रशंसनीय कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक विभाग व विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार व विभागाचे डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकाराने व मन्नत सामाजिक संस्थेच्या सहकार्याने केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेपाळ येथील एका व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार केल्यावर त्यास त्याच्या मूळ स्थानी (नेपाळ) येथे सोडून देण्याचे प्रशंसनीय कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक विभाग व विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार व विभागाचे डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकाराने व मन्नत सामाजिक संस्थेच्या सहकार्याने केले.
शेजारील राष्ट्र नेपाळ येथून रोजगाराच्या शोधात अनेक लोक मध्य भारतात येतात.फेकराज लिंबू हे नेपाळातून नागपूरला उदरनिवार्हासाठी आले होते.
६ मे २०१९ रोजी कडक उन्हाळ्याच्या काळात त्यांचा अपघात झाला. पायाला मोठी इजा झाली होती. त्यांच्या पायाचे हाड मोडले होते. ‘१०८ रुग्णवाहिका सेवे'च्या माध्यमातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता व ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शिवाय लिंबू यांना यकृताच्या आजाराने ग्रासले असल्याने नंतरच्या उपचारासाठी प्रा. डॉ. बनसोड यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले. रुग्णाला कुणीही आप्त व मित्र परिवार नसतानाही रुग्ण ठणठणीत बरा झाला. तसेच खर्च करण्याची परिस्थिती नसल्यास त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर होता. त्यासाठी समजासेवा अधीक्षकांमार्फतही विशेष प्रयत्न करण्यात आले होते. शिवाय नागपुरातील अनेक सामाजिक संस्थांमध्येही जागा उपलब्ध नव्हती. दरम्यान, रुग्णाविषयीची विस्तृत माहिती नेपाळ पोलिसांना देण्यात आली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लिंबू यांच्याबद्दल माहिती प्रसारित करण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने डॉ. अविनाश गावंडे व डॉ. नारलावार यांनी डॉ. सजल मित्रांच्या मार्गदर्शनात लिंबू यांना नेपाळमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान मन्नत सामाजिक संस्थेचे केदार अंबोकर यांनी लिंबू यांना नेपाळ येथे सुरक्षितपणे सोडण्याची जबाबदारी स्वीकारली. यासाठी लागणारा खर्च समाजसेवा अधीक्षकांनी निधी गोळा केला तसेच डॉ. अविनाश गावंडे यांनीसुद्धा आर्थिक सहकार्य केले. तसेच उर्वरित खर्च करण्याची तयारी मन्नत सामाजिक संस्थेने दर्शविली. अशाप्रकारे सगळ्यांच्या संयुक्त सहकार्यातून फेकराज लिंबू यांना नेपाळ येथे पोहचविण्यात आले. त्यांना १० जून रोजी नेपाळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
फेकराज लिंबू यांनी शुश्रुषा आणि नेपाळ येथे पोहचविण्यास सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्या रुग्णांना कुणी आप्तस्वकीय नसतात त्या रुग्णांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून उपचार करण्याचे प्रशंसनीय कार्य करण्यात येते. या कृतीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व समाजसेवा अधीक्षक विभागावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.