मुलीसह नांदेडचा आरोपी जेरबंद
By admin | Published: December 21, 2015 03:19 AM2015-12-21T03:19:33+5:302015-12-21T03:19:33+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खळबळ उडवून देणाऱ्या नांदेडच्या शेख सलिम शेख चांद (वय २५) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरात अटक केली.
एटीएसची कारवाई : सुरेंद्रगड झोपडपट्टीत होता आरोपी
नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खळबळ उडवून देणाऱ्या नांदेडच्या शेख सलिम शेख चांद (वय २५) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरात अटक केली. त्याच्यासोबतच मुलीलाही एटीएसने ताब्यात घेतले. नंतर या दोघांना नांदेड पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
शेख सलिम दोन वर्षांपूर्वी नागपुरात राहायचा. त्याने येथील एका तरुणीला नांदेडला पळवून नेले. तेथे त्याने तिच्याशी निकाह केला. त्यानंतर आता पुन्हा त्याने एका १७ वर्षीय मुलीला प्रेमजाळ्यात अडकवले आणि लग्नाचे आमिष दाखवून नांदेडमधून पळवून नेले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून राज्यातील विविध ठिकाणच्या पोलिसांना आरोपीची माहिती दिली. आरोपी सलिमचे लोकेशन नागपुरात मिळाल्याने एटीएसच्या स्थानिक पथकाने सलिम व अपहृत मुलीची शोधाशोध केली. तो गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगड झोपडपट्टीत असल्याचे लक्षात आल्यानंतर सलिमचा रात्रभर शोध घेण्यात आला.
रविवारी सकाळी त्याला ‘त्या’ मुलीसह एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने ती मुलगी आपली पत्नी असल्याचे सांगितले. तीसुद्धा अपहरणाचा इन्कार करू लागली. आपण स्वमर्जीने सलिमसोबत आल्याचे ती सांगत होती. मात्र, ती अल्पवयीन असल्यामुळे आणि नांदेड ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्यामुळे एटीएसच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. नांदेड पोलिसांना ते मिळाल्याची माहिती देऊन नागपुरात बोलावून घेण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीसह सलिम ज्या ठिकाणी आढळला ती झोपडी नब्बू भाई नामक व्यक्तीची असून, सलिमने ५०० रुपये महिन्याने ती भाड्याने घेतली होती. तो येथे १५ डिसेंबरपासून राहत होता, असेही प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. (प्रतिनिधी)
सलीमची पत्नीही गजाआड
विशेष म्हणजे, या अपहरण प्रकरणात सलिमची पत्नी फातेमाही सहभागी आहे. गुन्हा दाखल होताच तीसुद्धा नांदेडमधून पळून गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांना ती गवसली. शनिवारी गुजरात पोलिसांनीही फातेमाला ताब्यात घेतल्यानंतर नांदेड पोलिसांच्या हवाली केल्याचे वृत्त आहे.