नरखेडमध्ये तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:53 AM2017-08-04T01:53:30+5:302017-08-04T01:54:10+5:30

‘व्हॉटस्अप’ या ‘सोशल मीडिया’वर सुरू असलेल्या चर्चेतून वाद उद्भवून त्याचे पर्यवसान डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात झाले.

Nervous tension atmosphere | नरखेडमध्ये तणावाचे वातावरण

नरखेडमध्ये तणावाचे वातावरण

Next
ठळक मुद्देडॉक्टरला बेदम मारहाण : सोशल मीडियावरील चर्चेतून उद्भवला वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : ‘व्हॉटस्अप’ या ‘सोशल मीडिया’वर सुरू असलेल्या चर्चेतून वाद उद्भवून त्याचे पर्यवसान डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात झाले. सोबतच चर्चेत डॉक्टरची बाजू उचलून धरणाºयाच्या घरावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास नरखेडमध्ये झाला. यामुळे नरखेडमध्ये तणाव निर्माण होऊन अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली. वृत्त लिहिस्तो आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरू होते.
डॉ. सुभाष ज्ञानेवर वाघे, रा. नरखेड असे जखमीचे नाव आहे. ‘व्हॉटसअप’वर एका ग्रुपमध्ये देशभक्ती या विषयाला धरून बुधवारी रात्री चर्चा सुरू होती. त्यात दोन गटाचे नागरिक सहभागी होते. दोघेही आरोप - प्रत्यारोप करू लागले. त्यातून वाद उद्भवला. त्यामुळे एका समुदायाच्या १०० ते १५० नागरिकांनी गुरुवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास सावरगाव बसस्टँडजवळील डॉ. वाघे यांच्या क्लिनिकवर हल्ला चढविला. तेथील साहित्याची नासधूस करीत डॉ. वाघे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारत - मारत अर्ध्या किमी अंतरापर्यंत गुरमुळे ले-आऊटपर्यंत आणले. तेथे रामेश्वर शेंदरे यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या ग्रुपवरील चर्चेत लष्करामध्ये असलेला रामेश्वरचा लहान भाऊसुद्धा सहभागी होऊन डॉ. वाघे यांची बाजू घेतली होती. त्यामुळे हल्ला चढविण्याच्या विचारात समुदाय होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. थोड्याच वेळात ही माहिती शहरात पसरताच दोन्ही गटाने पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली.
याबाबत पोलीस निरीक्षक दिलीप मसराम यांनी लगेच कंट्रोल रुमला माहिती देताच अतिरिक्त पोलीस दल तैनात झाला. अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, कामठीचे ईश्वर कातकडे हेसुद्धा नरखेडमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हेसुद्धा नरखेडमध्ये दाखल झाले. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
या प्रकरणी डॉ. वाघे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२६, ३४२, २९४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. तर रामेश्वर शेंदरे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४५२, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.
आज नरखेड बंद
नरखेड येथील डॉ. सुभाष वाघे यांना मारहाण, शेंदरे यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ४) नरखेड बंदचे आवाहन व्यापारी संघटनेसह सर्वपक्षीयांनी घेतला आहे. सर्वच आरोपींना उद्यापर्यंत अटक न झाल्यास नरखेडमधील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सध्या शहरात कडेकोट बंदोबस्त असून शांततापूर्ण तणाव आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावरूनच पुन्हा वातावरणनिर्मिती केली जात आहे, हे विशेष!
 

Web Title: Nervous tension atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.