डिझेल चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:01+5:302021-03-19T04:09:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : परिसरात वाहनांच्या टँकमधील डिझेल चाेरीच्या घटना वाढत असतानाच केळवद पाेलिसांनी डिझेल चाेरणाऱ्या टाेळीतील तिघांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : परिसरात वाहनांच्या टँकमधील डिझेल चाेरीच्या घटना वाढत असतानाच केळवद पाेलिसांनी डिझेल चाेरणाऱ्या टाेळीतील तिघांना अटक केली असून, दाेघे पसार असल्याने त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. त्यांच्याकडून एकूण १५ लाख १७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि. १७) पहाटे केळवद (ता. सावनेर) परिसरात करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपी चाेरट्यांमध्ये नफीस खान उर्फ शाहरुख (२८), राकेश कुशवाह (३५) व गोविंद मालवे (२६) तिघेही रा. इंदाेर (मध्य प्रदेश) यांचा समावेश असून, दाेन पसार आराेपींची नावे कळू शकली नाही. केळवद परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या धाब्यांच्या आवारातून वाहनांच्या टँकमधून डिझेल चाेरीला जाण्याच्या घटना वाढल्या हाेत्या. केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली हाेती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे या भागात डिझेल चाेरट्यांची टाेळी सक्रिय असल्याची शंकाही पाेलिसांनी व्यक्त केली हाेती.
दरम्यान, केळवद पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एका धाब्याच्या आवारात उभ्या असलेल्या दाेन ट्रकच्या टँकमधून प्लास्टिकच्या कॅनमध्ये काही जण डिझेल काढत असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी शिताफीने त्यातील तिघांना ताब्यात घेतले तर दाेघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. त्यामुळे पाेलिसांनी त्या तिघांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून १५ लाख रुपये किमतीची कार व १७ हजार ४०० रुपये किमतीचे २०० लिटर डिझेल असा एकूण १५ लाख १७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
त्यांच्याकडून डिझेल चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली असून, पसार आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, सुरेश निंबाळकर, सचिन येलकर, किशोर ठाकरे, देवा देवकाते, गुणवंता डाखोळे, श्रीधर कुळकर्णी, सुभाष रुढे यांच्या पथकाने केली.
...
डिझेल विक्रीचे खापा कनेक्शन
चाेरटे ज्यावेळी ट्रक, टिप्पर किंवा इतर मालवाहू वाहनांच्या टँकमधील डिझेलची चाेरी करतात, त्यावेळी चालक वाहनांच्या केबिनमध्ये झाेपलेले असतात. त्यांना डिझेल चाेरीची साधी चाहूलही चाेरटे लागू देत नाही. ते प्रवासी वाहनांच्या टँकमधील डिझेलची चाेरी करीत नाहीत. ही मालवाहू वाहने धाब्यांच्या परिसरात उभी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास हे हात साफ करतात. त्यावेळी वाहनांचे चालक गाढ झाेपेत असतात. या भागातून चाेरी केलेले डिझेल ते खापा (ता. सावनेर) येथील व्यक्तीला विकत असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली.