नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार
By नरेश डोंगरे | Published: February 24, 2024 09:06 PM2024-02-24T21:06:32+5:302024-02-24T21:08:13+5:30
विविध विकासकामांना प्रारंभ : आमगाव, कामठी आणि भंडारा रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :रेल्वे मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर क्षेत्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकांवर विकास कामांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लवकरच या रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील १२०० रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शिलान्यास केला आहे. त्यावेळी या यादीत दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या गोंदिया, वडसा आणि चांदाफोर्ट या तीन रेल्वे स्थानकांचाही समावेश करण्यात आला होता. तर, अन्य काही स्थानकांच्या विकासाचा आराखडा तयार करून त्यांचाही पुनर्विकास करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, आता नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक, आमगाव, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, राजनांदगाव, डोंगरगड, बालाघाट, शिवनी, नैनपूर, मंडला फोर्ट, आणि छिंदवाडा या १२ रेल्वे स्थानकांच्याही विकासाचा आराखडा तयार झाला असून, तसे डिझाईनही तयार करण्यात आले आहे.
यातील नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वेस्थानकावर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार असल्याचा दावा दपूम रेल्वे प्रशासनाने केला आहे. ज्यात प्रशस्त आणि आरामदायक वेटिंग हॉल, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एस्किलेटरसह अन्य सुविधांचाही त्यात प्रामुख्याने समावेश राहणार आहे.
१२.३९ कोटींची तरतूद
नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकाच्या विकासकामांसाठी १२.३९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यातून स्थानकाची नवी आकर्षक ईमारत, उद्यान, प्रशस्त पार्किंग, सीसीटीव्ही, हायमास्ट, स्वच्छ शाैचालय आणि रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण आदी कामांचा समावेश आहे. परिसरातील संस्कृती आणि वारसासुद्धा चित्रांतून दाखविला जाईल.
सिटी सेंटरची संकल्पना
शहराच्या गजबजलेल्या भागात असलेल्या या रेल्वे स्थानकाला दोन्ही बाजूने जोडून सिटी सेंटर सारखे विकसित करण्याची योजना आहे. त्यामुळे या परिसरात प्रवाशांसोबत अन्य नागरिकांची गर्दी वाढून त्या भागातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होईल.