शेअर बाजारात गुंतवणूकीचे जाळे; अगोदर दिला नफा, नंतर घातला गंडा
By योगेश पांडे | Published: September 21, 2023 05:15 PM2023-09-21T17:15:12+5:302023-09-21T17:15:48+5:30
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : एका तरुणावर सायबर गुन्हेगारांनी शेअर बाजारात गुंतवणूकीचे जाळे फसले व जास्त फायद्याच्या नादात समोरच्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे त्याला चांगलेच भोवले. आरोपींनी अगोदर नफा देत त्यानंतर १.४५ लाखांचा गंडा घातला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रॉकी युवराज मारसिंगे (३१, अंतुजी नगर, भांडेवाडी) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. रॉकीला ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ८१४१९८४९५७ या क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देत खूप नफा होईल असे आमिष दाखविले. रॉकीने अगोदर फार कमी रक्कम गुंतवली, मात्र आरोपीने त्यावर चांगला नफा दिला.
रॉकीचा त्याच्यावर विश्वास बसला. समोरील व्यक्तीने आणखी ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखविले व रॉकीकडून १.४५ लाख रुपये वळते करवून घेतले. मात्र त्यानंतर त्याने कुठलाही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे रॉकीला लक्षात आले व त्याने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.