नागपूर नव्हे ‘रस्ते’पूर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:14 AM2018-07-02T10:14:26+5:302018-07-02T10:14:47+5:30
नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तब्बल ४०४६.३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे २०१९ पर्यंत वास्तवात साकारल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे सुरेख जाळे विणल्या जाईल.
जितेंद्र ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत सिमेंट रोडचे जाळे विणले जात आहे. मेट्रोच्या कामाने ‘बुलेट ट्रेन’सारखी गती पकडली आहे. डबल डेकर पूल उपराजधानीचे सौंदर्य फुलविणार असतानाच नागपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तब्बल ४०४६.३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे २०१९ पर्यंत वास्तवात साकारल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे सुरेख जाळे विणल्या जाईल.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २०१७-२०१८ या वित्तीय वर्षांत नागपूर जिल्ह्यात रस्तांचे जाळे विणण्यासाठी (उभारण्यासाठी) ४०४६.३५ लाख रुपयांच्या कामांना राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. प्रशासकीय मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवातही करण्याचे आदेश ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. ही कामे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर केली जातील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उपराजधानीचा लूक बदलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच धागा पकडत विकासाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागही मागे राहू नये, यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नरखेड, कळमेश्वर, सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौदा, कामठी, नागपूर आणि कुही तालुक्यात ७१.२८ किलोमीटर रस्तांची उभारणी आणि दर्जाउन्नती केली जाईल.