हॅटट्रिकचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 07:00 IST2020-12-26T07:00:00+5:302020-12-26T07:00:22+5:30
Nagpur News Chetan Sharma देशाचे माजी जलदगती गोलंदाज चेतन शर्मा यांनी १९८७ मधील विश्वचषक स्पर्धेत नागपूर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली होती. त्यांच्या या कामगिरीचे आजही स्मरण केले जाते. परंतु, शर्मा यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना हॅटट्रिक घेण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते, असा खुलासा केला.

हॅटट्रिकचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते
नीलेश देशपांडे
नागपूर : देशाचे माजी जलदगती गोलंदाज चेतन शर्मा यांनी १९८७ मधील विश्वचषक स्पर्धेत नागपूर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली होती. त्यांच्या या कामगिरीचे आजही स्मरण केले जाते. परंतु, शर्मा यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना हॅटट्रिक घेण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते, असा खुलासा केला.
शर्मा यांची बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त शर्मा यांनी जीवनातील अनुभव सांगितले. हॅटट्रिक विचार करून घेतली जात नाही. लागोपाठ दोन बळी घेतल्यानंतर गोलंदाजाच्या मनात हॅटट्रिकचा विचार येतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेईन, हे स्वप्न कधीच पाहिले नव्हते असे ते म्हणाले. संबंधित एकदिवसीय सामना ३१ ऑक्टोबर १९८७ रोजी झाला होता. त्यात घेतलेल्या हॅटट्रिकमुळे शर्मा हे अशी कामगिरी करणारे जगातील तिसरे तर, भारतातील पहिले गोलंदाज झाले होते. तसेच, विश्वचषक स्पर्धेत त्यांनीच पहिल्यांदा हॅटट्रिक घेतली होती. त्यांनी केन रुथरफोर्ड, ईयान स्मिथ व ईवेन चॅटफिल्ड यांना बाद केले. त्यामुळे न्यूझीलंड संघ चांगल्या स्थितीतून ८ बाद १८२ धावा असा कोलमडला होता.
आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करणे आणि सामना जिंकणे. तसेच, महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यासोबत सामनावीराचा पुरस्कार स्वीकारणे हे क्षण अभिमानास्पद होते. २० वर्षीय खेळाडू यापेक्षा दुसरी काय अपेक्षा करू शकतो. अशावेळी तुम्ही सर्व जग जिंकलेले असता, अशा भावना शर्मा यांनी व्यक्त केल्या. त्या सामन्यापूर्वी जखमी झालो होतो. परंतु, कर्णधार कपिल देव व संघाच्या व्यवस्थापनाने विश्वास दाखवून सामन्यात खेळवले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
त्या सामन्यात न्यूझीलंडला केवळ २२१ धावा करता आल्या. त्यानंतर कृष्णमाचारी श्रीकांत व सुनील गावसकर यांनी दमदार फलंदाजी करून भारताला विजय मिळवून दिला. शर्मा यांची हॅटट्रिक विशेष होती. त्यांनी तिन्ही फलंदाजांचा त्रिफळा उडवला होता. तसेच, याच सामन्यात गावसकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकवले होते. नागपूरचे चंद्रशेखर कारकर हे त्या सामन्याचे स्कोरर होते. लोकमत टाईम्सचे एडिटोरियल ॲडव्हायजर मेघनाद बोधनकर हेदेखील त्या सामन्याचे साक्षीदार आहेत.