कळमन्यात नवीन गहू व चण्याची आवक; गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव वाढले : पावसामुळे उशिरा आवक
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 13, 2024 08:30 PM2024-02-13T20:30:59+5:302024-02-13T20:31:22+5:30
कळमन्यात गव्हासोबतच चणा विक्रीचाही शुभारंभ झाला. नवीन चण्याला ६ हजार ते ६३५० रुपये क्विंटल भाव मिळाला.
नागपूर : मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्याच्या ओलावारी गावातील मिल क्वालिटी गव्हाच्या १०० पोत्यांच्या लिलावाने कळमना धान्य बाजारात सोमवारी विक्रीचा शुभारंभ झाला. गव्हाला २६५१ ते २६७१ रुपये क्विंटल भाव मिळाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत गव्हाला ४०० रुपये जास्त भाव मिळाला. यावर्षी पावसामुळे शरबती गहू कळमन्यात विक्रीसाठी येण्यास उशीर झाला आहे.
कळमन्यात गव्हासोबतच चणा विक्रीचाही शुभारंभ झाला. नवीन चण्याला ६ हजार ते ६३५० रुपये क्विंटल भाव मिळाला. जुन्या चण्याचा भाव ५२०० ते ५३०० रुपये क्विंटल आहे. नवीन चण्याला जास्त भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी आहेत. गेल्यावर्षी मुहूर्तावर चण्याला प्रति क्विंटल ४५०० ते ५ हजार रुपये भाव मिळाला होता. दररोज ४५०० ते ५ हजार पोत्यांची (क्विंटल) आवक आहे. याशिवाय यंदा आवक कमी असल्याने तूरीचे भाव वाढले आहेत. गेल्यावर्षीच्या प्रति क्विंटल ७५०० ते ८५०० रुपयांच्या तुलनेत यंदा तूरीला दर्जानुसार सर्वाधिक ९२०० ते १०,१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. दररोज ४ ते ५ हजार पोत्यांची आवक आहे. १५ ते २० दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.
यावर्षी उठाव नसल्याने सोयाबीनच्या भावात वाढ झालेली नाही. उलट भाव कमी होत आहेत. सध्या दर्जानुसार प्रति क्विंटल ३,९०० ते ४,५०० रुपये भाव आहेत. काही वर्षांपासून शेतकऱ्यांना भाव कमी मिळत असल्यामुळे उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे.
पावसामुळे आवक उशीरा
यावर्षी पावसामुळे गहू आणि चणा पिकाला उशीर झाला. वेळेवर पीक आले असते तर कळमन्यात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असती. गहू, चणा आणि तूरीची आवक नागपूर जिल्हा आणि लगतच्या राज्यातून सुरू आहे.
कमलाकर घाटोळे, पदाधिकारी, कळमना धान्य बाजार असोसिएशन.