नव्या फुलपाखरांनी वाढविले विदर्भाचे सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:37 PM2020-07-11T21:37:33+5:302020-07-11T21:38:16+5:30
अनेक प्रकारच्या जैवविविधतेसाठी पोषक असलेला विदर्भाचा भाग या चिमुकल्या जीवासाठीही पोषक आहे. त्यामुळे या भूमीत १८० प्रजातींच्या फुलपाखरांचे वास्तव्य आहे. आनंददायक म्हणजे यात पाच नव्या प्रजातींची भर पडली असून विदर्भाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळे रंग आपल्या पंखांवर कलात्मकतेने सजवून एका फुलावरून दुसऱ्या फुलाचा मकरंद घेत बागडणारी फुलपाखरे पाहून कुणालाही प्रसन्न वाटते. लहान मुलांना तर या रंगीबेरंगी फुलपाखरांचे विशेष आकर्षण. एरवी दुर्मिळ वाटणाऱ्या या फुलपाखरांचा पावसाळ्यात मुक्तसंचार असतो. अनेक प्रकारच्या जैवविविधतेसाठी पोषक असलेला विदर्भाचा भाग या चिमुकल्या जीवासाठीही पोषक आहे. त्यामुळे या भूमीत १८० प्रजातींच्या फुलपाखरांचे वास्तव्य आहे. आनंददायक म्हणजे यात पाच नव्या प्रजातींची भर पडली असून विदर्भाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भासह देशभरातील फुलपाखरांचा अभ्यास करणारे निसर्गमित्र यादव तरटे पाटील यांनी या नव्या पाहुण्यांबाबत माहिती दिली. त्यातील एक म्हणजे ‘ब्ल्यू मार्मन’ होय. विशेषत: म्हणजे सह्याद्रीच्या परिसरात आढळणारे ब्ल्यू मार्मन अतिशय सुंदर असून त्याला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून गौरविण्यात येते. २०१७ मध्ये अशाप्रकारे फुलपाखराचा गौरव करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य होय. इतर चार फुलपाखरांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले ‘सायकी’, ‘इंडिगो फ्लॅश’, ‘कॉमन फाईव्ह रिंग’ आणि ‘ब्राईट बाबूल ब्ल्यू’ या प्रजातींचा समावेश आहे. या प्रजातींची नोंद फुलपाखरू तज्ज्ञ डॉ. जयंत वडतकर यांनी केली, हे उल्लेखनीय आहे. रंग व आकारावरून त्यांच्यातील फरक दिसून येतो, मात्र काही प्रजाती वगळल्या तर बहुतेकांचा सखोल अभ्यास झाला नसल्याची खंत यादव तरटे यांनी व्यक्त केली. या नव्या पाहुण्यांच्या नोंदीने विदर्भात आढळणाऱ्या प्रजातींची संख्या १८५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे राज्यात ती २७७ आहे आणि देशात १५०५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे.
जुलै महिना अतिशय पोषक
विशेषत: जुलै महिन्याचा काळ फुलपाखरांसाठी चांगला मानला जातो. उन्हाळ््यात तापमान अधिक असल्याने हे जीव सुप्तावस्थेत असतात. आपल्या परिसरात आर्द्र आणि पानगळी प्रकारची जंगले आहेत. म्हणजे उन्हाळ्यात पानगळ झाल्यानंतर पाऊस सुरू होताच झाडांना कोवळी पालवी फुटते. ही कोवळी पालवी फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी, त्यांच्या मुंगीएवढ्या लार्व्हांसाठी अतिशय पोषक असते. झाडांची ही कोवळी पाने खाऊनच त्यांची वाढ होते. म्हणून हा महिना त्यांच्यासाठी आणि फुलपाखरांचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही सर्वात महत्त्वाचा मानला जातो.
लॉकडाऊनमुळे वाढली संख्या
गेल्या काही वर्षात विदर्भातच नाही तर देशभरात फुलपाखरांचे प्रमाण चिंताजनक कमी झाले होते. कोविड नियंत्रणासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट झाली. शिवाय वनक्षेत्रातील मानवाचा धुडगूसही कमी झाला. त्यामुळे फुलपाखरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. पूर्वी शहरात दुर्मिळ वाटणारे रंगबिरंगी फुलपाखरे यावेळी मात्र मुक्तसंचार करताना दिसल्याचा उल्लेख यादव तरटे यांनी केला.
वाघाप्रमाणे फुलपाखरांना मारणेही गुन्हा
यादव तरटे यांनी यावेळी महत्त्वाचा खुलासा केला. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत वाघाची शिकार करणाऱ्याला आणि फुलपाखरांना मारणाऱ्यांना एकाच शिक्षेची तरतूद आहे. वाघाप्रमाणे डॅनाईड एग-फ्लाय प्रजातीची फुलपाखरे कायद्याच्या शेड्यूल-१ मध्ये येतात. या फुलपाखरांचीही तस्करी होत असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी ही तरतूद करण्यात आली. इतर प्रजाती शेड्यूल-४ मध्ये येतात. मात्र याची माहिती बहुतेकांना नाही.