संधीसोबतच नवे आव्हान

By admin | Published: April 27, 2017 02:26 AM2017-04-27T02:26:23+5:302017-04-27T02:26:23+5:30

देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहराला राजकीय, सांस्कृतिक व प्रशासकीयदृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे.

A new challenge with opportunity | संधीसोबतच नवे आव्हान

संधीसोबतच नवे आव्हान

Next

अश्विन मुदगल : महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
नागपूर : देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहराला राजकीय, सांस्कृतिक व प्रशासकीयदृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे सकारात्मक नेते या शहरात आहेत. अशा शहराचा विकास करण्यासाठी महापालिका आयुक्त म्हणून मिळालेली जबाबदारी एक मोठी संधी आहे. सोबतच आव्हानही असल्याचे प्रतिपादन आयुक्त अश्विन मुदगल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
महापालिका मुख्यालयात मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अश्विन मुदगल यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. दिवसभरात अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख व झोनचे सहायक आयुक्त यांच्याशी चर्चा करून कामकाजाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांना प्रथमच संधी मिळाली आहे. तीही वेगाने विकास होत असलेल्या नागपूरसारख्या शहराच्या आयुक्तपदाची जबाबदारी मिळाली आहे. पदाधिकारी व अधिकारी तसेच नागरिकांशी समन्वय ठेवून शहरातील विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण झाले पाहिजे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना सक्षमतेने राबविली जावी. तसेच सुरू असलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्याला प्राधान्य राहील. महापालिकेचा कारभार पारदर्शी राहील अशी ग्वाही मुदगल यांनी दिली.महापालिकेतील महत्त्वाची व तांत्रिक स्वरूपाची ३४ टक्के पदे रिक्त आहेत. ती भरण्याचा प्रयत्न करू. या संदर्भात न्यायालय व शासनाचे आदेश प्राप्त झाले आहे.
काही विभागांचा आकृतिबंध तयार आहे. त्यानुसार लवकरच पदभरती करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

आर्थिक शिस्तीला प्राधान्य
महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. याबाबतची विस्तृत माहिती घेऊ न यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. करवसुली अधिक सुलभ करून अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा प्रयत्न राहील. मनपाला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करू. आर्थिक स्थितीचा विकास प्रकल्पांवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
नदी स्वच्छता अभियानाला गती
शहराचा ऐतिहासिक वारसा अलेली नागनदी तसेच पिवळी व पोहरा नदी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल. शहरातील नद्यात प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जाते. यामुळे या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील. अशी माहिती मुदगल यांनी दिली.
उपराजधानी स्मार्ट सिटी होईल
स्मार्ट शहरांच्या यादीत नागपूरचा समावेश करण्यात आला आहे. ३३३५ कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार नाही. १००० कोटीचा निधी केंद्र, राज्य सरकार आणि नासुप्र खर्च करणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Web Title: A new challenge with opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.