मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या अजनी डेपोत लागली नवी सीएनसी लेथ मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:26 AM2021-03-15T11:26:18+5:302021-03-15T11:26:41+5:30
Nagpur News रेल्वेच्या कोचची चाके आणि वॅगनच्या चाकांची आता त्वरित दुरुस्ती होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात अजनी आरओएच डेपोत नवी सीएनसी लेथ मशीन लावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या कोचची चाके आणि वॅगनच्या चाकांची आता त्वरित दुरुस्ती होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात अजनी आरओएच डेपोत नवी सीएनसी लेथ मशीन लावण्यात आली आहे. ही मशीन ६.८ कोटी रुपयात कॉफमोव्हने खरेदी केली आहे
सीएनसी हायटेक मशीनची एका पाळीत २० चाके दुरुस्त करण्याची क्षमता आहे. ही मशीन स्वयंचलित असून त्यासाठी केवळ दोन ते तीन कर्मचाऱ्यांची गरज भासते. ही मशीन अजनी डेपोत लावण्यापूर्वी कोच आणि वॅगनची चाके रस्ते मार्गाने कुर्दवाडी आणि भुसावळ येथील कार्यशाळेत पाठविण्यात येत होती. आता सीएनसी मशीनमुळे ही चाके अजनी डेपोतच दुरुस्त होणार असल्यामुळे वाहतुकीच्या खर्चात बचत होणार असून, वॅगनची चाके अधिक काळ दुरुस्तीसाठी प्रलंबित न राहता त्वरित दुरुस्त होतील. यामुळे त्वरित वॅगन मालवाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. या मशीनची देखभाल ज्या कंपनीकडून ही मशीन खरेदी केली ती कंपनीच सात वर्ष करणार आहे. ही मशीन औद्योगिक मानक ४.० नुसार अनुकूल असून मशीनला कमी वीज आणि जागा लागते.
...............