मनपा स्थायी समिती बैठक रद्द करण्यावरून नवा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 08:36 PM2020-05-16T20:36:17+5:302020-05-16T20:39:05+5:30
स्थायी समितीची येत्या बुधवार २० मे रोजीची प्रस्तावित बैठक रद्द करण्यासंदर्भात प्रभारी निगम सचिव रंजना लाडे यांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले आहे. नागपूर शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फि जिकल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थायी समितीची येत्या बुधवार २० मे रोजीची प्रस्तावित बैठक रद्द करण्यासंदर्भात प्रभारी निगम सचिव रंजना लाडे यांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले आहे. नागपूर शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फि जिकल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून विविध बैठकांचे आयोजन सुरू आहे. यासाठी फि जिकल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही. मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम लागू होतो का ? असा प्रश्न उपस्थित करून या संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके मनपा प्रशासनाला पत्र देणार असल्याने यातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीची येत्या बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा, शहरातील पाणीपुरवठा व अन्य अत्यावश्यक सेवा संदर्भात चर्चा केली जाणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ते दूर करण्याची गरज आहे. याचा विचार करता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेही महापालिका मुख्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, कोविड-१९ संदर्भात बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांना उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांहून अधिक संख्या स्थायी समितीच्या बैठकीला राहणार नाही. त्यामुळे स्थायी समितीची बैठक रद्द करण्यासंदर्भातच नियम आहे का? असा सवाल करून निगम सचिवांनी दिलेल्या पत्रासंदर्भात मनपा प्रशसानाला सोमवारी पत्र देणार असल्याची माहिती पिंटू झलके यांनी दिली.
महापालिका कायद्यात सभागृह व स्थायी समितीला विशेष अधिकार आहेत. असे असताना प्रशासनाने चर्चा न करता बैठक रद्द करण्याचे आदेश काढल्याने समितीने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.