उपराजधानीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:40 AM2017-07-18T01:40:54+5:302017-07-18T01:41:33+5:30
नागपूरच्या गुन्हेगारीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगारांची भर पडत आहे.
- राहुल अवसरे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या गुन्हेगारीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगारांची भर पडत आहे. ही धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात आहे. मात्र शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने वारंवार गुन्हा करण्याचे प्रमाण नगण्य आहे. उपलब्ध माहितीनुसार २०१५ मध्ये भारतीय दंड विधान अंतर्गत ११ हजार १८ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यात १० हजार ४७९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. हे सर्व गुन्हेगार नवीन होते. २०१४ मध्ये १० हजार २७४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. २०१४ च्या मानाने २०१५ मध्ये झालेली वाढ ३.०६ टक्के होती.
लैंगिक छळाचे ४३७ गुन्हेगार
बलात्काराच्या घडलेल्या एकूण १६६ घटनांमध्ये १८३ पीडित होत्या. या गुन्ह्यात २०१ जणांना अटक करण्यात आली होती. लैंगिक छळाच्या ३९२ गुन्ह्यात ४३७ जणांना अटक करण्यात आली होती. विवाहितांच्या संदर्भातील गुन्हेगारी अंतर्गत हुंडाबळीच्या ९ गुन्ह्यात २४, आणि पतीकडून विवाहितेच्या छळाच्या ३०९ घटना घडून ६६१ जणांना अटक करण्यात आली होती.
विश्वासघाताच्या ७३ घटनांमध्ये ७३, फसवणुकीच्या ३१३ घटनांमध्ये ३५२ आणि दस्तावेज हेरफेरीच्या ७७ गुन्ह्यात ६० जणांना अटक करण्यात आली होती. गैरकायद्याची मंडळी जमवण्याच्या २४ घटनांमध्ये ९८ आणि दंग्याच्या १४२ घटनांमध्ये ७४५ जणांना अटक करण्यात आली होती.
चोरांचा सुळसुळाट
उपराजधानीच्या या शहरात चोरट्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येते. घरफोडीच्या १०७९ घटना घडून ४०९ जणांना अटक करण्यात आली होती. तर चोरीच्या ३०४४ घटना घडून १३५९ जणांना अटक करण्यात आली होती. दरोडा घालणाऱ्या ११३ आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या १३३ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच जबरीचोरीत ४६४ घटना घडून ५६२ जणांना अटक करण्यात आली होती. यात मंगळसूत्र पळविणाऱ्या गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
अपहरण अधिक,अटक कमी
अपहरणाच्या ३५५ घटना घडून त्यात ३८३ लोक पीडित होते. या गुन्ह्यात ११२ जणांना अटक करण्यात आली होती. अपहरणाचे गुन्हे अधिक असले तर अटक मात्र फारच कमी होती. या उलट खंडणी वसुलीच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यातील अटक संख्या दुप्पट होती. खंडणी वसुलीचे ७८ गुन्हे घडून १५० गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती.
खून ७९, अटक २१२
खुनाच्या ७९ घटनांमध्ये ८६ जणांचा मृत्यू होऊन २१२ जणांना अटक करण्यात आली होती. खुनाच्या प्रयत्नाच्या ८४ घटनांमध्ये ८७ जण जखमी होऊन २४७ जणांना अटक करण्यात आली होती. गंभीर दुखापतीच्या २३३ गुन्ह्यात तेवढेच जखमी होऊन ३०९ जणांना अटक करण्यात आली होती.