नवीन शोध हीच चांगल्या वैज्ञानिकाची ओळख
By Admin | Published: January 19, 2017 02:54 AM2017-01-19T02:54:20+5:302017-01-19T02:54:20+5:30
जगात आज कुठलीच गोष्ट अशक्य नाही. वैज्ञानिकांनी मनात आणले तर अनेक महत्त्वाचे व समाजाच्या हिताचे शोध लागू शकतात.
राकेश कुमार : पाच दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : जगात आज कुठलीच गोष्ट अशक्य नाही. वैज्ञानिकांनी मनात आणले तर अनेक महत्त्वाचे व समाजाच्या हिताचे शोध लागू शकतात. किंबहुना असे नवनवीन शोधच वैज्ञानिकाला एक नवीन ओळख मिळवून देत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था,नागपूर (नीरी)चे निदेशक डॉ. राकेश कुमार यांनी केले. रमण विज्ञान केंद्र व तारामंडल विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्यावतीने बुधवारी आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एन. कुटुंबाराव, डॉ. राकेश कुमार व रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक एन. रामदास अय्यर उपस्थित होते. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे अपर महानिदेशक डॉ. एन. कुटुंबाराव म्हणाले, रमण विज्ञान केंद्राने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. हे विज्ञान प्रदर्शन समाज आणि मुलांसाठी निश्चितच लाभदायक सिद्ध होईल. या पाच दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप २२ जानेवारीला होईल. यात १३ वैज्ञानिक संस्था सहभागी झाल्या आहेत. या प्रदर्शनाद्वारे विविध विज्ञान आणि औद्योगिक संस्थांमध्ये होणारे संशोधन आणि विकास कार्य याबाबत समाजात जनजागृती केली जात आहे. या क्रमात यंदा जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डिझाईन डेव्हलपमेंट सेंटर, नागपूर व मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि., नागपूर या दोन नवीन विज्ञास संस्था सहभागी झाल्या आहेत. यातील पहिल्या संस्थेने अल्युमिनियमने मिश्रित धातू कसे बनविले जाते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तर मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. या संस्थेचे संशोधक विद्यार्थ्यांना सोने, चांदी, तांबे, पितळ हे धातू कोणत्या दगडापासून मिळतात याबाबत माहिती देताना दिसले. आज पहिल्या दिवशी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन संशोधनाचे कार्य समजून घेतले. रमण विज्ञान केंद्रातर्फे आयोजित थ्री डी शोलाही मोठा प्रतिसाद मिळाला.(प्रतिनिधी)
सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत पाहता येईल प्रदर्शन
विद्यार्थी व नागरिकांना हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ५या वेळेत मोफत पाहता येईल. या दरम्यान रोज दुपारी १२ वाजता वैज्ञानिक मार्गदर्शन करतील. आजच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन रमण विज्ञान केंद्राचे शिक्षा अधिकारी अभिमन्यू भेलावे यांनी तर आभार शिक्षा अधिकारी विलास चौधरी यांनी मानले.