नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे : विजय भटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:07 PM2019-07-29T22:07:46+5:302019-07-29T22:08:56+5:30
भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे, असे आवाहन संगणकतज्ज्ञ तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेनेविज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे, असे आवाहन संगणकतज्ज्ञ तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर यांनी केले.
स्व. दादासाहेब काळमेघ यांचा २२ वा स्मृतिदिन मातोश्री विमलाबाई पंजाबराव देशमख सभागृहात सोमवारी सायंकाळी डॉ. भटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा तसेच आमदार प्रा.अनिल सोले, माजी महापौर डॉ. कल्पना पांडे होत्या. यावेळी डॉ. भटकर यांनी स्व. दादासाहेबांच्या स्मृतीला उजाळा दिला. ते म्हणाले, दादासाहेब विज्ञानाचे विद्यार्थी होते. कसलीही सुबत्ता नसताना त्यांनी अनेक शाळा उघडल्या. यशस्वी युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते. शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते पूर्ण झाले. आज चांद्रयान आम्ही पाठवू शकलो, ही शिक्षणाची संधी दादासाहेबांसारख्याच्या परिश्रमातून मिळाली. त्यामुळे देश या सर्वांचा ऋणी आहे.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून दादासाहेबांच्या जीवनकर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले, दादासाहेबांनी सामाजिक जबाबदारी केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून कार्य केले. विद्यापीठाचे लोकविद्यापीठात रूपांतरण होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. विद्यापीठाच्या कार्यात लोकशाहीपूरक सहभाग कसा असावा, हे आपण त्यांच्याकडून शिकलो. १९७९ ते १९८१ या त्यांच्या व्हाईस चान्सलरपदाच्या काळामध्ये विद्यापीठाचे कायदे लिहिले गेले. त्यावर आजही कार्य चालत आहे. आयुष्याची किंमत चुकवून निष्ठेने आणि एकाकीपणे ते लढले. ते सर्वसामान्यांतून आले. सोबत शिदोरी घेऊन आले, मात्र आयुष्यभर भाकरी वाटत राहिले, अशा शब्दात मिश्रा यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. त्यांची जीवननिष्ठा व कार्य पुढे चालविणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार अनिल सोले म्हणाले, अभाविपचा सचिव म्हणून काम करताना विद्यापीठातील आंदोलनाच्या काळात दादासाहेबांचे कार्य जवळून पाहता आले. विद्यापीठाचे अनेक विषय त्यांच्यासमोर नेण्याची संधी मिळाली. त्यातून शिकता आले. डॉ. कल्पना पांडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी स्व. दादासाहेब स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. पी.एम. ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठीचा आग्रह
शिक्षण लोकाभिमुख असावे, त्याची नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली असावी. भाषा लोपली की संस्कृती जाते, हे सांगून डॉ. विजय भटकर यांनी मराठीचा आग्रह धरला. ते म्हणाले, विज्ञानाचे शोध सर्वसामान्यांपर्यत पोहचायला हवे. मराठी कळते, पण स्मार्टफोनमध्ये इ-मेल मराठीत नसेल तर सर्वसामान्यांना काय फायदा? शेतकऱ्यांना मोबाईलवरील इंग्रजी अर्थशास्त्र, कॉमर्स कळत नसेल तर काय फायदा ? स्मार्टफोनवर मराठी वापरता येत असेल तरच विज्ञानाच्या तंत्राचा फायदा सामान्यांना होईल. हे तंत्र सामान्यांचे व्हावे. शिक्षणपद्धतीमध्ये लवचिकता असावी. मराठी आणि गणित सर्वांना येईल, याचा आग्रह आणि विचार शैक्षणिक संस्थांनी करावा.