नवे परीक्षा नियंत्रक २७ आॅगस्टला मिळणार
By admin | Published: August 13, 2015 03:35 AM2015-08-13T03:35:35+5:302015-08-13T03:35:35+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकपदाची प्रतीक्षा २७ आॅगस्ट रोजी संपणार आहे.
नागपूर विद्यापीठ : १२ उमेदवार शर्यतीत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकपदाची प्रतीक्षा २७ आॅगस्ट रोजी संपणार आहे. या दिवशी मुलाखती होऊन नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी १२ उमेदवार शर्यतीत आहेत. याअगोदर विद्यापीठाने दोनवेळा प्रक्रिया राबविली, परंतु एकदाही निवड झाली नाही. यंदा तरी निवड होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विलास रामटेके यांनी मुंबई येथील ‘जे.जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चर’ येथे ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. श्रीकांत कोमावार, प्रशांत मोहिते व आता डॉ. अनिल हिरेखण यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. विलास रामटेके यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या परीक्षा नियंत्रकपदावर अद्याप पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. परीक्षा विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून निकालांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती व्हावी, यासाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे प्रयत्नरत आहेत. नागपूर विद्यापीठाने पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमण्यासाठी जाहिरात काढली. इच्छुक उमेदवारांकडून २९ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षा नियंत्रकपदाच्या शर्यतीत १२ उमेदवार आहेत. यातील पाच नवीन असून उर्वरित सात उमेदवार मागील वेळेचेच आहेत. १२ उमेदवारांमध्ये विद्यापीठाच्या ३ अधिकाऱ्यांचादेखील समावेश असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)