काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासाठी नव्या चेहऱ्याचा शोध
By admin | Published: February 15, 2016 02:57 AM2016-02-15T02:57:17+5:302016-02-15T02:57:17+5:30
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती ...
चव्हाण यांचे नेत्यांशी ‘वन टू वन’ : मुळक,गुडधे, राऊत, भोयर चर्चेत
नागपूर : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी सकाळी रविभवनात स्थानिक नेत्यांशी ‘वन टू वन’ चर्चा करून जिल्हाध्यक्षाबाबत त्यांच्या शिफारशी जाणून घेतल्या. आजच्या हालचालींवरून मार्चपूर्वी नव्या जिल्हाध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या चर्चेत नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, युवक काँग्रेसच्या माजी रामटेक लोकसभा अध्यक्ष कुंदा राऊत, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह आणखी एक-दोन नावांची शिफारस करण्यात आली. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचेही नाव समोर आले. मात्र, इच्छुकांपैकी कुणीही आपल्याला अध्यक्ष करा, अशी विनंती प्रदेशाध्यक्षांकडे केली नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, प्रदेश काँग्रेसने तो मंजूर न करता नवा अध्यक्ष नेमेपर्यंत पदावर काम करण्याची सूचना केली होती. त्यानंतर सातत्याने नवा अध्यक्ष नेमला जाईल, अशा चर्चा रंगायच्या. मात्र, निर्णय झाला नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी रविभवन येथे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार, कुंदा राऊत, संजय मेश्राम आदींशी चव्हाण यांनी व्यक्तिगत चर्चा केली. चर्चेदरम्यान चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव सुचविण्याची सूचना केली. त्यावर काही नेत्यांनी थेट नाव सुचविणे टाळत आपण व मुकुल वासनिक घेईल तो निर्णय मान्य असेल, अशी भूमिका घेतली. आ. सुनील केदार यांनी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे नाव भक्कमपणे मांडले. काहींनी गावंडे यांच्या जागेवर ग्रामीणमधील कुंदा राऊत किंवा सुरेश भोयर योग्य राहतील, असे मत मांडले. राजेंद्र मुळक यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, मुळक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला. दरम्यान चव्हाण यांनी मोहिते यांनाही जिल्हाध्यक्ष पदाबाबत विचारणा केली. त्यांनीही सक्षम नेतृत्त्वाला संधी देण्यात यावी, अशी मागणी केली. स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतल्यानंतर चव्हाण हे अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा करतील व त्यानंतरच जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल. मार्चपूर्वी जिल्ह्याला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी घेतला आढावा
या वेळी चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. विधानसभा लढलेल्या सहाही उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.