मनपात जानेवारीत ‘नवा गडी नवे राज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:12+5:302020-12-08T04:08:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापौर संदीप जोशी यांचा पक्षाने निश्चित केलेला कार्यकाळ जानेवारीत संपत आहे. त्यानुसार नव्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर संदीप जोशी यांचा पक्षाने निश्चित केलेला कार्यकाळ जानेवारीत संपत आहे. त्यानुसार नव्या महापौरांचा प्रस्ताव पुढील महिन्यातील सभागृहात येणार आहे. जोशी यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी महापौरपद मिळणार आहे.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये नंदा जिचकार यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच दयाशंकर तिवारी यांनी महापौरपदावर दावा केला होता. त्यांच्यासोबतच जोशी यांचेही नाव चर्चेत होते. त्यामुळे शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना प्रत्येकी सव्वा वर्ष महापौरपद देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. पक्षात ठरल्यानुसार संदीप जोशी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यानंतर दयाशंकर तिवारी शहराचे ५४ वे महापौर म्हणून सूत्रे स्वीकारतील. मात्र, यासाठी तांत्रिक बाबीची पूर्तता करावी लागणार आहे. जोशी यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर समिती विभागाकडून नव्या महापौरांच्या निवडीसाठी सभागृहाकडे प्रस्ताव पाठविला जाईल.
संदीप जोशी यांची महापौरपदी निवड झाली होती. त्यांना भाजपच्या त्यावेळी उपस्थित असलेल्या १०४ नगरसेवकांनी मते दिली होती. परंतु आता महापौर राजीनामा देत असल्याने त्यांच्याऐवजी तिवारी यांची निवड होणार आहे.
......
महापौरांच्या राजीनाम्याची चर्चा
पदवीधर निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तसेच महापौरपदाचाही कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याची सोमवारी दिवसभर चर्चा रंगली होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे अनेक नागरिकांनी याबाबत खात्री करून घेतली. एवढेच नव्हे नगरसेवक, पदाधिकारीही नागरिकांच्या फोनमुळे त्रस्त झाले. भाजपाचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांच्याशी संपर्क साधला असता महापौरांनी राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनीही याला दुजोरा दिला.
....
मागील वर्षी सव्वा सव्वा वर्षे महापौरपदाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसारच नवीन महापौर होतील. यासाठी सभागृहात प्रस्ताव येईल. २० डिसेंबरला सभागृह आहे. परंतु या सभागृहात हा प्रस्ताव येणे आता शक्य नाही. त्यामुळे पुढील सभागृहात प्रस्ताव येईल.
- संदीप जाधव, सत्तापक्ष नेते, महापालिका.