रेल्वेच्या मालवाहतूकीसाठी देवळी स्थानकावर नवीन गुडस् शेड
By नरेश डोंगरे | Published: May 6, 2024 07:49 PM2024-05-06T19:49:15+5:302024-05-06T19:49:31+5:30
वर्धा जिल्ह्यात नवीन पर्याय; यवतमाळ जिल्ह्यात पोहचणार माल
नागपूर: स्वस्त आणि जलद माल वाहतुकीसाठी व्यापाऱ्यांची पहिली पसंती असलेल्या रेल्वेने वर्धा जिल्ह्यात माल वाहतूकीसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वर्धा -यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गावर देवळी रेल्वे स्थानकावर सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या गुडस् शेडच्या रुपातील ही नवीन व्यवस्था होय. कमी खर्चात आणि कमी वेळेत माल पोहचवण्यासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. रेल्वेच्या पार्सल विभागातून व्यापारी मोठ्यात मोठे पार्सल पाहिजे त्या ठिकाणी पोहचवत असतात.
रेल्वेच्या प्रशस्त नेटवर्कमुळे सर्वत्र ही व्यवस्था उपलब्ध असल्याने व्यापाऱ्यांना ते सोयीचे पडते. धान्य, फळे, दुसरे अवजड सामान किंवा छोटी मोठी वाहनेही रेल्वेच्या मालवाहतूक विभागातर्फे ईकडून तिकडे पाठविली जातात. ज्या ठिकाणी रेल्वेची व्यवस्था नाही, अशा गाव-शहराच्या नजिकच्या रेल्वे स्थानकापर्यंत हा माल पोहचतो आणि तेथून तो हव्या त्या ठिकाणी व्यापारी दुसऱ्या वाहनाने घेऊन जातात. यवतमाळ येथे तूर्त रेल्वेची अशी सोय नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील व्यापारी, उध्योजक, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे स्थानकावर माल पाठवितात.
तेथून नंतर तो माल, ट्रक, ट्रॅक्टरने यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी घेऊन जातात. येत्या महिनाभरात धामणगाव गुड्स शेडच्या थर्ड लाईनचे काम सुरू होणार असल्याने धामणगाव गुड्स शेडमधील सर्व काम बंद होणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वे प्रशासनाने देवळी (जि. वर्धा) रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
या संबंधाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी धामणगावचे सहायक व्यवस्थापक (गुडस्) हेमंत बेहरा यांच्यासोबत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, नर्मदा बायोटेक लिमिटेड आणि स्मार्ट केम टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
देवळी गुड्स शेड अधिकृतपणे व्यावसायिक वापरासाठी सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना त्यांच्या माल वाहतुकीसाठी याचा वापर करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. धामणगाव पेक्षा देवळी गुडस् शेडचा पर्याय यवतमाळचे अंतर कमी असल्यामुळे अधिक चांगला आणि सुलभ होईल, हे सोधारण पटवून देण्यात आले. संबंधित कंपन्यांनीही देवळीच्या नव्या पर्यायाला पसंती दर्शविली आहे.
झपाट्याने विकास; खासगी संस्थांचा पर्याय
वेगात सुरू असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्गावर सध्या वर्धा-देवळी-कळंबपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. कळंब आणि यवतमाळ येथील रेल्वे स्थानकांचा झपाट्याने विकास करण्यासाठी खासगी संस्थांचा पर्याय शोधला जात आहे. या दोन्ही स्थानकांवर गती शक्ती कार्गो टर्मिनल बांधण्यासाठी स्वारस्य असलेल्या व्यक्ती, संस्थांकडून लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे, मित्तल यांनी सांगितले आहे.