नागपूर मनपात सहारेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा नवा गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:16 AM2018-08-03T00:16:14+5:302018-08-03T00:17:15+5:30
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला आणखी एक नवी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या लढाईत तानाजी वनवे यांच्या बाजूने गेलेले काही नगरसेवक आता त्यांच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे. वनवे हे विरोधी पक्षनेते असले तरी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या पाठिशी उभे राहत नाही, असा आरोप करीत काँग्रेस नगरसेवकांनी आपले नेतृत्व संदीप सहारेंनी करावे, अशी भूमिका घेतली आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी घेतलेल्या काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेवकांनी वनवे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. यामुळे वनवे यांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला आणखी एक नवी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या लढाईत तानाजी वनवे यांच्या बाजूने गेलेले काही नगरसेवक आता त्यांच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे. वनवे हे विरोधी पक्षनेते असले तरी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या पाठिशी उभे राहत नाही, असा आरोप करीत काँग्रेस नगरसेवकांनी आपले नेतृत्व संदीप सहारेंनी करावे, अशी भूमिका घेतली आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी घेतलेल्या काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेवकांनी वनवे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. यामुळे वनवे यांची चिंता वाढली आहे.
शहरात काँग्रेसमधील गटबाजी नवी नाही. विलास मुत्तेमवार विरुद्ध माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद असा सामना सातत्याने सुरू आहे. महापालिका निवडणुकीनंतर चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आले. मात्र, त्यानंतरही गटबाजी थांबण्याऐवजी अधिक तीव्र झाली. महापालिकेत विरोधी पक्षनेता निवडताना तर एकमेकांविरोधात शक्तिप्रदर्शन झाले. महापालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. सुरुवातीला मुत्तेमवार गटाने संजय महाकाळकर यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपविली होती. प्रदेश काँग्रेसने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, त्यानंतर महाकाळकर यांना हटविण्यासाठी चक्र फिरले व १७ नगरसेवकांचे बहुमत सिद्ध करीत तानाजी विरोधी पक्षनेते झाले होते. वाद न्यायालयात गेला, पण निर्णय वनवेंच्या बाजूने आला. या घडामोडीमुळे विकास ठाकरे यांनी स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत जाता आले नाही. हा मुत्तेमवार- ठाकरे गटाला मोठा धक्का होता.
वनवे विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही काँग्रेसचे उर्वरित नगरसेवक त्यांना आपला नेता माणण्यास तयार नव्हते. अशातच ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी पलटी घेतली. ते मुत्तेमवार गटात सामील झाले. आता असंतुष्ट गटाचे नेतृत्व सहारे करीत आहेत. तानाजी वनवे हे आपल्याच पक्षातील नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, सर्व नगरसेवकांना समान निधी मिळावा, यासाठीही प्रयत्न करीत नाहीत. ते भाजपाशी हात मिळवून फक्त स्वत:साठी निधी मिळवितात, असा विरोधी गटातील नगरसेवकांचा आरोप आहे. ही खदखद वाढत असतानाच गुरुवारी दुपारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी एका हॉटेलमध्ये नगरसेवकांची बैठक घेतली. तीत नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, नितीश ग्वालबंशी, हरीश ग्वालबंशी, नितीन साठवणे, दर्शनी धवड, साक्षी राऊत, रश्मी धुर्वे, दिनेश यादव, संजय महाकाळकर, भावना लोणारे, स्नेहा निकोसे, परसराम मानवटकर आदी उपस्थित होते़ वनवे यांचे समर्थक मानले जाणारे दिनेश यादव, परसराम मानवटकर व नगरसेविका नेहा निकोसे यांचे पती राकेश निकोसे हे बैठकीला हजर होते़ उज्ज्वला बनकर शहराबाहेर होत्या. या बैठकीत वनवे यांच्या विरोधात नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, आपल्या गटाचे नगरसेवक ठाकरे यांच्या बैठकीला गेल्याच ेसमजताच नेत्यांनी सूत्रे फिरविण्यास सुरुवात केली. बैठकीला आलेले नगरसेवक शेवटपर्यंत उपस्थित राहिले.
सहारे आमचे नेते, सभेपूर्वी बैठक घेणार
या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी संदीप सहारे हेच आमचे नेते असल्याची भूमिका मांडली. वनवे यांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव पडत नाही. ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्यामुळे आमचे प्रश्न सुटेनासे झाले आहेत, अशा भावना नगरसेवकांनी मांडल्या. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या सभेपूर्वी सहारे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांची बैठक व्हावी व त्यात सभागृहात भाजपाला कसे घेरायचे ही रणनीती ठरवावी, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर सहारे यांनी लोकमतशी बोलताना आपल्यासोबत १६ नगरसेवक असल्याचा दावा केला. येत्या काळात अधिकृतपणे गटनेता बदलण्याचे संकेतही त्यांनी दिले.