हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवे दिशानिर्देश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 10:27 PM2021-12-01T22:27:58+5:302021-12-01T22:28:51+5:30
Nagpur News काेविड-१९च्या ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे भारत सरकारने काही देशांना गंभीर सुचित ठेवले आहे. देशात या व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
नागपूर : काेविड-१९च्या ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे भारत सरकारने काही देशांना गंभीर सुचित ठेवले आहे. देशात या व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या संबंधात २८ नाेव्हेंबरला जारी मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंध कायम राहतील. हवाई प्रवाशांनी दिशानिर्देशांचे पालन केले नाही व उल्लंघन केले तर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
येणाऱ्या दिवसात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानांनी येतील किंवा जातील, त्यांना १५ दिवसांत कुठे कुठे प्रवास केला हे स्पष्ट करावे लागेल व त्यानुसार चाैकशीही केली जाईल. चुकीची माहिती देणाऱ्यांविराेधात डिझास्टर ॲक्ट २००५ नुसार कारवाई करण्यात येईल. गंभीर सुचितील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना वेगळ्या काउंटरवर तपासणी केली जाईल आणि सात दिवसांच्या इन्स्टिट्यूशलन क्वाॅरण्टाइनमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर दाेन दिवस, चार दिवस व सात दिवसांनंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येईल. यामध्ये पाॅझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात पाठविण्यात येईल आणि निगेटिव्ह आल्यास सात दिवस हाेम क्वाॅरण्टाइन राहावे लागेल.
दुसऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. पाॅझिटिव्ह आल्यास रुग्णालयात जावे लागेल आणि निगेटिव्ह आल्यास १४ दिवस गृहविलगीकरणात राहावे लागेल. कनेक्टिंग फ्लाइट असलेले असे प्रवासी ज्यांना विमानतळाच्या बाहेर पडायचे नाही, त्यांनाही आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल व निगेटिव्ह आल्यानंतरच पुढच्या प्रवासाची परवानगी देण्यात येईल. याबाबत विमान कंपन्यांनाही सूचना देण्यात येईल. पाॅझिटिव्ह आल्यास या प्रवाशांना विलगीकरणाचे तेच नियम लागू असतील जे इतर प्रवाशांसाठी ठरविण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्येच हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लसीचे दाेन्ही डाेस झाल्याचे प्रमाणपत्र किंवा ४८ तासांच्या मुदतीतील आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट सादर करावा लागेल. दुसऱ्या राज्यातून जे प्रवासी येतील त्यांनाही ४८ तासांपूर्वी केलेला आरटीपीसीआर रिपाेर्ट सादर करणे बंधनकारक असेल.