उपराजधानीत नव्या वर्षात नव्या आरोग्य सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:57 AM2020-01-01T10:57:07+5:302020-01-01T10:58:48+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाला सरत्या वर्षात ७६ कोटी १० लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून उपचारांसाठी येणाऱ्या हजारो गरीब रुग्णांना मेडिकल, मेयो नव्या वर्षात नव्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. वैद्यकीय सेवेचा पाया अधिक मजबूत करणार आहे. विशेषत: मेडिकलच्या तीन महत्त्वाच्या विभागाचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) रुग्णसेवेत सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय, बहुप्रतीक्षित असलेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाला, आंबेडकर रुग्णालयात अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या कार्याला सुरुवात होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाला सरत्या वर्षात ७६ कोटी १० लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. हॉस्पिटलच्या बांधकामाची जबाबदारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली आहे. यामुळे नव्या वर्षात कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात होऊन रुग्णांना अद्ययावत उपचार मिळणार आहेत.
डॉ. आंबेडकर अतिविशेषोपचार रुग्णालयाला मंजुरी
कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राची स्थापना होऊन १४ वर्षे उलटूनही हे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागापुरतेच (ओपीडी) मर्यादित आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये या रुग्णालयाच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र माला मंजुरी दिली. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधी देण्याची घोषणाही झाली. मात्र दरम्यानच्या काळात हा प्रकल्पच रखडला. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा या रुग्णालयाच्या विकासावर चर्चा झाल्याने पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र माला नव्याने मंजुरी मिळाली. यामुळे डॉ. आंबेडकर रुग्णालय लवकरच नव्या रूपात दिसण्याची शक्यता आहे.
आयसीयूतून मिळणार अद्ययावत उपचार
आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसºया क्रमांकाच्या मेडिकलमध्ये केवळ मेडिसीन विभागाचे २० खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) आहे. याची दखल घेऊन शल्यचिकित्सा विभाग, औषधवैद्यकशास्त्र विभाग व बालरोग विभागासाठी आयसीयूच्या इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. सरत्या वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. प्रत्येक विभागाच्या २७ खाटांच्या या आयसीयूमध्ये यंत्रसामुग्रीच्या खरेदीलाही प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे नव्या वर्षात हा विभाग रुग्णसेवेत सुरू होण्याची शक्यता आहे.