नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी ‘डोक्यालिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:04 PM2018-01-10T19:04:24+5:302018-01-10T19:19:35+5:30

शेतात टाकलेले बियाणे शेतातून घरी येईपर्यंत, शेतकऱ्याला पिकाची जोपासना करावी लागते. त्यातच पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि चोरट्यांचे ‘लक्ष्य’ यामुळे शेतकऱ्यांना सजग राहावे लागते. रोगराईपासून वाचण्यासाठी कीटकनाशकाचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तर वन्यप्राणी, पक्ष्यांचा उपद्रव आणि चोरट्यांच्या तावडीतून पिके वाचण्यासाठी शेतकरी भन्नाट ‘क्लृप्त्या’ योजत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

New idea for protecting crops from wildlife in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी ‘डोक्यालिटी’

नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी ‘डोक्यालिटी’

Next
ठळक मुद्देपारंपरिकच नव्हे नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब पक्ष्यांचा धुमाकूळ आणि चोरीलासुद्धा बसला आळा

गणेश खवसे  

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शेतात टाकलेले बियाणे शेतातून घरी येईपर्यंत, शेतकऱ्याला पिकाची जोपासना करावी लागते. त्यातच पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि चोरट्यांचे ‘लक्ष्य’ यामुळे शेतकऱ्यांना सजग राहावे लागते. रोगराईपासून वाचण्यासाठी कीटकनाशकाचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तर वन्यप्राणी, पक्ष्यांचा उपद्रव आणि चोरट्यांच्या तावडीतून पिके वाचण्यासाठी शेतकरी भन्नाट ‘क्लृप्त्या’ योजत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पारंपरिक बुजगावण्यासोबतच नवतंत्रज्ञानाचाही आधार शेतकऱ्यांनी यासाठी घेतला आहे. तारांमध्ये विद्युत प्रवाहित करण्यासारखे प्रयोग अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच आता शेतकऱ्यांनी ‘रेकॉर्डेड आवाज’, हलणाऱ्या पट्ट्या आणि त्यापासून होणारा आवाज यासारख्या अभिनव प्रयोगाला पसंती दिली आहे. यासोबतच विविध पद्धतींचा अवलंब करीत वन्यप्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करीत असल्याचे नागपूर जिल्ह्यात दिसून येते.
डोंगराळ, जंगली भागालगत असणाऱ्या शेतीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ असतो. त्यामुळे पिकांची रखवाली केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसतो. यासाठी पूर्वीपासून तर आतापर्यंत पिकांचे वन्यप्राणी, पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी लाकडी मचाण (मोडची, मोर्ची)चा वापर करून पिकांवर नजर ठेवली जात. एखाद वन्यप्राणी, पक्ष्यांचे थवे पिकांमध्ये दिसल्यास गोफणीच्या साहाय्याने दगड भिरकावले जात. ही पारंपरिक पद्धत शेतकºयांनी आजही जोपासली आहे. त्यासोबतच बुजगावणे लावण्याकडे शेतकरी अधिक प्राधान्य देतात. त्यातही बुजगावण्याला शर्ट, पॅन्ट घालून दिले जाते. तर डोक्याच्या जागेवर माठ लावून त्याला सजविले जाते. दुरून बघितल्यास जणू एखादी व्यक्तीच शेतात उभी असल्याचा भास होतो. त्यामुळे दूरवर असलेल्या वन्यप्राणी, पक्ष्यांचीही त्याचप्रकारे फसवणूक होऊन ते आल्यापावली परतात. यासह इतरही ‘भन्नाट कल्पना’ पीक वाचविण्यासाठी केल्या जातात.
वन्य प्राण्यांना मारणे हा गुन्हा असल्याने त्यांच्यापासून केवळ संरक्षण करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे अशा पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातच शेताभोवती तारेचे कुंपण करून त्यामध्ये विद्युत प्रवाहित केल्याने अनेक दुर्घटना झाल्याने, त्या तारांमुळे शेतकरी अडचणी आल्याने आता तारांच्या काटेरी कुंपणावर शेतकऱ्यांचा अधिक भर असल्याचे दिसून येते.
याआहेत नानाविध क्लृप्त्या
वन्यप्राणी, पक्ष्यांपासून पिकांना वाचविण्यासाठी पारंपरिक बुजगावणे शेतकरी आजही शेतात लावतात. त्यासोबतच काटेरी झाडांच्या फांद्या धुऱ्यावर टाकल्या जातात. सिमेंट, लाकडांचे खांब लावून तारेचे कुंपण घातले जाते. काटेरी तारांचेही कुंपण केले जाते. तारांची जाळी असलेले कुंपणही शेताभोवती लावले जाते. पिकामध्ये ठरावीक अंतरावर पांढऱ्या रंगाची पोती खांबावर लटकविल्या जातात. तसेच शेतामध्ये कॅसेटची रिल, रेडिमेड चकाकणारी रिल (पट्टी) लावली जाते. ही पट्टी वाजत असल्याने वन्यप्राणी, पक्षी त्यापासून दूर राहतात. एवढेच काय तर पिंप घेऊन शेतकरी ते दिवसभर ठरावीक वेळेने वाजवितात. तसेच शेतकरी स्वत:च वेगवेगळे आवाज काढून वन्यप्राणी आणि पक्ष्यांना हाकलून लावण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
फटाक्यांसह रेकॉर्डेड आवाजाला पसंती
वन्यप्राण्यांना शेतातून पळवून लावण्यासाठी शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती ही रेकॉर्डेड फटाक्यांच्या आवाजासह विविध प्राण्यांच्या रेकॉर्डेड आवाजाला दिली आहे. यासाठी एक छोटे संयत्रामध्ये पेनड्राईव्ह लावला जातो. त्या सयंत्राला स्पिकर जोडून ते स्पिकर पिकामध्ये विशिष्ट ठिकाणी ठेवले जातात. ते संयंत्र सुरू करताच ठरावीक वेळाने त्यातून आवाज येतात. त्यामुळे वन्यप्राणी, पक्षी पिकाजवळ आल्यास त्या आवाजामुळे घाबरून पळतात. त्यातही वन्यप्राण्यांच्या आवाजापेक्षा फटाक्यांचा रेकॉर्डेड आवाज आणि ढोलच्या आवाजाला शेतकरी अधिक प्राधान्य देतात. अलीकडे सीडी प्लेअर, डीव्हीडी प्लेअरही शेतात ठेवून त्याला पेनड्राईव्ह कनेक्ट करीत असल्याचे दिसून येते.
विद्युत प्रवाहित तारा जीवघेण्या
पिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी बऱ्याचदा तारेचे कुंपण घालून त्या तारांमध्ये विद्युतप्रवाह सोडला जातो. मात्र या वीजतारा जीवघेण्या ठरल्या असल्याचे नागपूर जिल्ह्याचे वास्तव चित्र आहे. त्यातही गेल्या दीड महिन्यात अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यातच या तारांना स्पर्श होऊन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला दोषी धरून त्याला शिक्षाही होते. परिणामी अत्यल्प शेतकरीच आता अशापद्धतीचा उपयोग करीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: New idea for protecting crops from wildlife in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.