नागपुरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 08:20 PM2019-01-04T20:20:02+5:302019-01-04T20:21:10+5:30
नागपूर शहरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. येत्या २६ जानेवारीपूर्वी त्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. येत्या २६ जानेवारीपूर्वी त्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली.
फॉर्च्युन फाऊंडेशन, जिल्हाधिकारी नागपूर, इसीपीए, नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘यूथ एम्पॉवरमेंट समिट’चे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्षा निशा सावरकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र्र पाटील, आ. नागो गाणार, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी खासदार दत्ता मेघे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
सध्या विदर्भातील मिहानमध्ये ५० हजार रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य असून, त्यापैकी २७ हजार तरुणांना रोजगार दिला आहे. येत्या वर्षात ५० हजार युवकांना रोजगार मिळेल. पायाभूत सुविधांची वाढ करताना रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यातून विकासाचा वेग प्रचंड वाढत आहे. त्यामुळे येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असला तरी त्यांनी रोजगार देणारे व्हा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी युवकांना केले. विदर्भात मेट्रो, ड्रायपोर्ट, सिंचनासाठी पाणी, विमानतळ, आयआयआयटी, आयआयएम, लॉ युनिव्हरसीटी आहे. त्यामुळे विदर्भातील विकासाचा वेग प्रचंड वाढला असल्याचे सांगून गडकरी यांनी व्यावसायिकतेकडे लक्ष देऊन नवनवीन टेक्नॉलॉजी आणून उद्योग उभे राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच नागपुरातील लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीला डिम विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगांना चालना देऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, याकडे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. तसेच नुकत्याच राज्य मंत्रिमंडळाने नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मुंबई मेट्रो आणि लोकलच्या धर्तीवर ब्रम्हपुरी-उमरेड- पवनी - रामटेक - मौदा- वर्धा - भंडारापर्यंत मेट्रो तथा ब्रॉडगेज रेल्वेने वाहतूक होईल आणि या भागाचा प्रादेशिक स्तरावर विकास होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
विदर्भात सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योगनिर्मिती आणि रोजगारही मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नामुळे येत्या काही दिवसांमध्ये नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू होत असून, संत्रानगरी तसेच टायगर कॅपिटल असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनासही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवनवीन तंत्रज्ञानामुळेही रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच रोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र, महिला बचत गटांनाही धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युथ एम्पॉवरमेंट समिट आणि वृक्षदिंडीच्या सीडींचे विमोचन करण्यात आले.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही समयोचित भाषण झाले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. तर संदीप जाधव यांनी आभार मानले.
मी मंत्री असेपर्यंत भारतात विनाचालकाच्या गाड्या येणार नाही
देशातील २२ लाख युवकांना वाहतूक क्षेत्रात रोजगार मिळाला. मात्र, मध्यंतरी माझ्याकडे विनावाहक कारचा प्रस्ताव आला होता, विनावाहक कार देशात आणून बेरोजगारी वाढेल, यामुळे मी तो प्रस्ताव नाकारला. मी मंत्री असेपर्यंत भारतात विनाचालकांच्या गाड्या येणार नाहीत, असेही गडकरी यांनी जाहीर केले.