‘पेंट मार्कर’ चित्रकारांसाठी नवे माध्यम
By admin | Published: August 3, 2014 01:00 AM2014-08-03T01:00:46+5:302014-08-03T01:00:46+5:30
रंग, ब्रश पाहिले की अनेकांचे हात शिवशिवतात. जोवर दोन-चार फटकारे कॅनव्हासवर मारत नाही, तोवर समाधान होत नाही. आता तीच अनुभूती ‘पेंट मार्कर’मधून मिळत आहे. चित्रकारांच्या रंग आणि
नागपूर : रंग, ब्रश पाहिले की अनेकांचे हात शिवशिवतात. जोवर दोन-चार फटकारे कॅनव्हासवर मारत नाही, तोवर समाधान होत नाही. आता तीच अनुभूती ‘पेंट मार्कर’मधून मिळत आहे. चित्रकारांच्या रंग आणि कुंचल्यांच्या विविध आयुधात आता पेंट मार्करचाही समावेश झाला आहे. चित्रकाराला आपल्या भावना आणखी प्रांजळपणे मांडण्याला याची मदतच होणार आहे, असे मत जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व सोनी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी मांडले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके, प्रा. गुणवंत देवघरे, सोनी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकाश सोनी व सेल्स आणि मार्केटिंगचे संचालक डॉ. एस.जी. ठोंबरे उपस्थित होते.
डॉ. ठोंबरे म्हणाले, पूर्वी छन्नी, हातोडी हे कुंचले तर दगड हा कॅन्व्हॉस असायचा. नंतरच्या काळात बराच बदल होऊन ट्युबमध्ये रंग येऊ लागले. आता त्याही पुढे जाऊन ‘पेंट मार्कर’ आले आहे. ‘अॅक्रेलिक’ आणि ‘अल्कोहल’ या दोन प्रकारात उपलब्ध पेंट मार्करमुळे चित्र आणखी आकर्षक करणे सोपे झाले आहे. वॉटर कलर, आॅईल कलर, अॅक्रेलिक कलरमध्ये आता या नवीन माध्यमाचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे पेंट मार्करमुळे चित्र कमी वेळात काढणे शक्य झाले आहे. सध्या ४० रंगात असलेले हे पेंट मार्कर भविष्यात आणखी विविध रंगात उपलब्ध होणार आहे. व्यावसायिक चित्रकारही याला चांगली पसंती देत आहे. यावेळी प्रा. रामटेके आणि डॉ. देवघरे यांनीही आपले विचार मांडले. संचालन व आभार जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक मिलिंद लिंबेकर यांनी मानले.
शासकीय चित्रकला महाविद्यालयात हीच कार्यशाळा ३० जुलै रोजी घेण्यात आली होती. यात ४००हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
त्यांची चित्रे आणि शनिवारी कार्यशाळेत सहभागी झालेल्या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. प्रदर्शनातील चित्रनिर्मिती सर्वांना परिचित असणाऱ्या विषयाची असल्याने अनुभवलेल्या अनेक रंगछटा चित्रात दिसून येत होत्या. (प्रतिनिधी)