नवमातांनो, काळजी घ्या.. बाळाच्या श्वासनलिकेत दूध गेल्याने होतोय ‘हा’ अनर्थ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 08:00 AM2023-06-14T08:00:00+5:302023-06-14T08:00:01+5:30

Nagpur News आईने दूध पाजल्यानंतर ते श्वासनलिकेत गेल्यामुळे श्वास गुदमरून बाळाचा मृत्यू झाल्याच्या ४४ घटना वर्षभरात घडल्या आहेत.

New mothers, be careful | नवमातांनो, काळजी घ्या.. बाळाच्या श्वासनलिकेत दूध गेल्याने होतोय ‘हा’ अनर्थ  

नवमातांनो, काळजी घ्या.. बाळाच्या श्वासनलिकेत दूध गेल्याने होतोय ‘हा’ अनर्थ  

googlenewsNext

सुमेध वाघमारे

नागपूर : गोंदिया येथून एक महिला आपल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याला घेऊन नागपुरात नातेवाइकांकडे आली. दुपारी बाळाला दूध पाजले आणि लगेच पाळण्यात टाकले. अर्ध्या तासानंतर बाळाला उठवायला गेले असताना ते थंड पडले होते. डॉक्टरांना दाखविल्यावर मृत घोषित केले. दूध श्वसननलिकेत गेल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे निदान झाले. दुसऱ्या घटनेत २० दिवसांच्या नवजात बाळाला आई झोपून दूध पाजत असताना त्याचा गुदमरून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, नागपूर जिल्ह्यात यासारख्या घटनांमधून वर्षभरात ४४ तान्हुल्यांचा घरीच मृत्यू झाला. काही घटना वगळता निष्काळजीपणाचा हा कळस असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अकाली जन्म, जन्मत: कमी वजन; जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, श्वसनावरोध, आघात, अशी नवजात बालकांच्या रुग्णालयातील मृत्यूची कारणे आहेत; परंतु घरी असलेल्या नवजात बाळाला सांभाळताना झालेली एक चूकदेखील महागात पडू शकते. बालके नि:शब्द असतात, ते आपल्या समस्या कृत्यातून आणि रडण्यातून मांडतात. यामुळे बाळाचा सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांना सतत सावध राहून बाळाच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असते. थोडासा हलगर्जीपणादेखील बाळाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. नुकतीच याची ही दोन उदाहरणे समोर आली आहेत.

- वर्षभरात १,३८१ बालकांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या दरम्यान १,३८१ बालकांचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये ८०२, मेयोमध्ये २४८, डागा रुग्णालयात ३९, खासगी रुग्णालयात २४८, तर घरात मृत्यू झालेल्या बाळांची संख्या ४४ आहे. या आकडेवारीनुसार दर महिन्याला जवळपास ६० ते १०० बालकांचा विविध कारणाने मृत्यू होतो. बहुसंख्य मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यानातील आहेत; परंतु जे घरी मृत्यू झालेले आहेत ते वाचविणे शक्य असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- महिन्याकाठी २ ते ४ बाळांचा घरीच मृत्यू

नागपुरात महिन्याकाठी जवळपास २ ते ४ बाळांचा घरीच मृत्यू होत असल्याचे पुढे आले आहे. एप्रिलमध्ये २, मेमध्ये ५, जूनमध्ये ०, जुलैमध्ये २, ऑगस्टमध्ये ५, सप्टेंबरमध्ये २, ऑक्टोबरमध्ये ४, नोव्हेंबरमध्ये ४, डिसेंबरमध्ये १, जानेवारीमध्ये १०, फेब्रुवारीमध्ये ३, तर मार्चमध्ये ६ बालकांचा घरीच मृत्यू झाला.

-झोपून दूध पाजू नका- डॉ. गावंडे

बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, ज्या घरात नवजात बाळ आहे त्यांनी अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे असते. बाळाला झोपून दूध पाजू नये. दूध पाजल्यानंतर बाळाची ढेकर काढावी. बाळ ढेकर देईलच असे नाही; परंतु दूध दिल्यानंतर त्याला हळुवार उचलून धरावे. त्यानंतर बाळाला डाव्या कुशीवर थोडे उंच ठेवून झोपवावे. बाळाला ठाराविक वेळेत थोडे थोडे दूध पाजावे. भुकेलेले बाळ पटापट दूध पिते व जास्तीचे प्यालेले दूध बाहेर टाकते अशावेळी श्वसननलिकेत दूध जाण्याची भीती असते. कमी वजनाचे बाळ असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी. रात्री नवजात बाळाजवळ झोपताना खबरदारी घ्यावी. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: New mothers, be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य