भारत घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय धोरण आवश्यक - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर
By आनंद डेकाटे | Published: April 8, 2024 06:40 PM2024-04-08T18:40:41+5:302024-04-08T18:40:59+5:30
भारत घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय धोरण आवश्यक - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर
नागपूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनिवार्य असून शंभर टक्के लागू होणार आहे. नवीन पिढी अर्थात भारताला घडविण्यासाठी एनईपी आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट २ संपर्क अभियान कार्यशाळा गुरुनानक भवन येथे सोमवारी पार पडली.
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. तर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, लिटूचे संचालक डॉ. राजू मानकर, नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, कुलसचिव डॉ. राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. देवळणकर म्हणाले, बारावीनंतर ४० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात येतात. उर्वरित पदवी, अन्य अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पारंपरिक अभ्यासक्रमाबाबत अनास्था असल्याने काही विद्यार्थी प्रवेशच घेत नसतील. उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची रचना बदलली आहे हे सांगण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास आता कौशल्य, आवडीचे शिक्षण, मेजर- मायनर, ऑन जॉब ट्रेनिंग, विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. एनईपीत रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांना हे सांगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी बारावीतील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे सांगितले. उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण २० टक्क्याने कमी होत आहे. त्यामुळे विद्यापीठांमधून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे तसेच त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
प्रास्ताविक प्र-कलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. डॉ. स्मिता आचार्य यांनी आभार मानले.