नवीन अधिसूचना या आठवड्यातच
By admin | Published: July 25, 2014 12:48 AM2014-07-25T00:48:04+5:302014-07-25T00:48:04+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून महाविद्यालयांमध्ये किमान शिक्षक भरतीच्या निकषांमध्ये लवकरच बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या तायवाडे
नागपूर विद्यापीठ : किमान शिक्षक भरतीस मिळणार मुदतवाढ
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून महाविद्यालयांमध्ये किमान शिक्षक भरतीच्या निकषांमध्ये लवकरच बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या तायवाडे समितीच्या अहवालाला विद्यापीठाने मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार ५० टक्के नियमित शिक्षक भरतीसाठी वर्ष अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या अटींमुळे निर्माण झालेली प्रवेशाची कोंडीदेखील लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत.
२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली आहे. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट आहे.
महाविद्यालयांना जाचक ठरणाऱ्या या अटींवर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विद्यापीठ प्राधिकरणांतील सदस्य, महाविद्यालये, प्राचार्य व टीचर्स फोरम इत्यादींकडून करण्यात आली. त्यानुसार यासाठी डॉ.बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला अहवाल मागील आठवड्यात विद्यापीठाकडे सादर केला. ५० टक्के नियमित शिक्षक नियुक्तीची अट पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात यावी, अशी सूचना या समितीने दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या समितीच्या शिफारशींनुसार विद्यापीठाकडून या आठवड्यातच किमान शिक्षक भरतीच्या निकषांसंदर्भात नवीन अधिसूचना काढण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)