वाहनांचा वाढलेला दंड आता चालकांच्या खिशाला पडणार भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 10:39 AM2021-12-03T10:39:58+5:302021-12-03T11:04:11+5:30

महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता, आता ५००० रुपये करण्यात आला आहे.

new penalties rules are now imposed on traffic offences | वाहनांचा वाढलेला दंड आता चालकांच्या खिशाला पडणार भारी

वाहनांचा वाढलेला दंड आता चालकांच्या खिशाला पडणार भारी

googlenewsNext
ठळक मुद्देपरवाना नसताना आता पाच हजार रुपये दंडसीटबेल्टवरील दंडाच्या रकमेत घट

नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवीत असाल तर सावधान. आता जर असे कराल तर तुमच्या खिशाला भारी पडेल, सोबतच तीन महिन्यासाठी वाहन परवानाही निलंबित होईल.

महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता, आता ५००० रुपये करण्यात आला आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास पूर्वी सरसकट दंड आकारला जात होता. परंतु आता प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळा दंड आकारला जाणार आहे.

मोटार वाहन कायद्यात २०१९ मध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली होती. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली. दंडाच्या रकमेत वाढ झाल्याने काही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. आता कुठलीही चर्चा न करता दंडाच्या काही रकमेत वाढ तर काहीमध्ये कठोर तरतूद करण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२१ रोजी याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नव्या दंडामुळे बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी मदत होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- हेल्मेट, पीयूसी नसल्यास तीन महिन्यासाठी परवाना निलंबित

पूर्वी हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड आकारला जात होता. यामुळे अनेक वाहनधारक दंड भरून निघून जात होते. परंतु आता दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली नसली तरी तीन महिन्यासाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, पीयूसी नसल्यास तीन महिन्यासाठी परवाना निलंबित केला जाणार आहे.

- सीटबेल्ट नसल्यास २०० रुपये दंड

वाहन चालविताना सीटबेल्ट घालून नसल्यास १००० रुपये दंड आकारला जायचा. परंतु नव्या कायद्यात दंडाच्या रकमेत घट करून ती २०० रुपयावर आणली आहे.

- अंमलबजावणी सुरू

परिवहन विभागाने गुरुवारी दुपारी सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यात नव्या कायद्याप्रमाणे गुरुवारपासूनच कारवाई करण्याचे आदेश दिले.

- दंडाचा प्रकार : पूर्वी : आता

:: परवाना नसताना वाहन चालविणे : १००० : ५०००

:: फॅन्सी नंबरप्लेट किंवा रिफ्लेक्टर्स नसणे : ५०० : प्रथम गुन्ह्यासाठी १००० दुसऱ्या गुन्ह्यासाठी १५००

:: विना तिकीट प्रवास : तिकिटाच्या दुप्पट रक्कम : ५००

:: पोलिसांच्या सूचनेचे पालन न केल्यास, पळून गेल्यास : ५०० : ७५०

:: अनधिृकत व्यक्तीला वाहन चालविण्यास दिल्यास : १००० : ५०००

:: वाहनाचे परमीट नसल्यास : १००० : १०,०००

:: पीयूसी नसल्यास : ५०० : १,०००

:: वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (दुचाकी व तीनचाकी) : ५००: १०००

:: वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (ट्रॅक्टर) : ५०० : १५००

:: वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (कार ) : ५०० : २०००

:: वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (जड वाहन ): ५०० : ४०००

:: वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (दुचाकी व तीनचाकी) : ५००: १०००

:: वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (कार) : ५०० : २०००

:: वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (जड वाहन) : ५०० : ४०००

:: वाहन चालविण्यास अपात्र असताना वाहन चालविल्यास : ५०० : १०००, दुसऱ्यांदा गुन्ह्यासाठी २०००

:: शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे : ५०० : पहिल्या गुन्ह्याकरिता ५००० दुसऱ्या गुन्ह्याकरिता १०,०००

:: वाहनात बदल केल्यास : १००० : प्रत्येक बदलासाठी २०००

:: नोंदणी न करता वाहन चालविल्यास : ५००० : १००००

:: विमा नसताना वाहन चालविल्यास : १००० : पहिल्या गुन्ह्याकरिता २००० दुसऱ्या गुन्ह्याकरिता ४०००

:: वाहनाबाहेर माल आल्यास : २,००० : २०,०००

:: सीटबेल्ट : १००० : २००

नियम पाळणाऱ्यांना आता दंडाची भीती नाही

अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने केंद्राने घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यात आली असून १ डिसेंबरपासून वाढीव दंड आकारण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आरटीओचे अधिकारी व पोलिसांच्या कारवाईमुळे बेशिस्तीचे प्रमाण कमी होईल. दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली असली तरी नियम पाळणाऱ्यांना दंडाची भीती नाही. 

अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

Web Title: new penalties rules are now imposed on traffic offences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.