उपाययोजनांसाठी नवा आराखडा : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:06 AM2018-07-08T00:06:48+5:302018-07-08T00:08:02+5:30
नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.
पावसाचे पाणी साचणारी शहरातील ६६ ठिकाणे आहेत. यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीच्या कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच उपायोजना हाती घेतल्या जातील . पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७०० पेक्षा अधिक लोकांना अग्निशमन विभाग व एनडीआरएफच्या पथकांनी सुरक्षिपणे बाहेर काढल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिली.
शुक्र वारी रात्री १२ वाजेपर्यत शहरातील पूरग्रस्त व पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी रात्री उशिरापर्यत कार्यालयात होते. वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. संकटग्रस्तांनी मदतीसाठी संपर्क साधताच तातडीने उपलब्ध करण्याचे मदत व बचाव पथकाला निर्देश दिले जात होते.
शुक्रवारी शहरातील २७ ठिकाणी पाणी साचले होते.मेडिकल चौक, पडोळे हॉस्पिटल जवळील चौकात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. तसेच काही वस्त्यातही अशीच समस्या निर्माण होते. यावर तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तुंबलेली गटारे व पावसाळी नाल्यात साचलेला गाळ व कचरा काढण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. पुन्हा मुसळधार पाऊ स पडल्यास आपत्ती निवारण विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी दिली.
पावसाळा संपताच नाल्या सफाई
गटारे व पावसाळी नाल्या साफ करण्याला बराच कालावधी लागतो. याचा विचार करता पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यात गटारे व नाल्या सफाईच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पाणी साचण्याची समस्या उद्भवलेल्या भागासह शहराच्या सर्वच झोनमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.