नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:09 AM2020-02-21T11:09:04+5:302020-02-21T11:09:30+5:30
आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्तमान शिक्षण हे थराथराने रचलेले, स्तरीकृत असल्यासारखे आहे. १५ वर्षापर्यंत प्राथमिक-माध्यमिक शिक्षण, नंतर चार वर्ष पदवी, पुढे मास्टर्स आणि पीएच.डी. विद्यापीठाच्या, महाविद्यालयांच्या शिक्षणात संशोधनाला वाव न मिळणे ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करणारे शिक्षणाचे धोरणच नसल्यासारखे वाटते. यापेक्षा एखादवेळी विद्यार्थ्याने घेतलेला विषय नकोसा वाटल्यास तो सोडून आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे माजी चेअरमन आणि केंद्र शासनाच्या नवे शिक्षण धोरणा करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांना वनराई फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवारी नीरी येथील सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र मुळक, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, माजी संचालक डॉ. एस. आर. वटे, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, फाऊंडेशनचे सचिव किशोर धारिया प्रामुुख्याने उपस्थित होते. त्यांनी यावेळी नीरी आणि वनराईच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. सतीश धवन आणि डॉ. यु.आर. राव यांच्या मार्गदर्शनातून दिशा मिळाल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कार्याविषयी माहिती दिली. संचालन रेखा घिया-दंडिगे यांनी केले.
राजकीय नेतृत्वामुळे शिक्षण व विज्ञान अपयशी : पृथ्वीराज चव्हाण
युपीए शासनाच्या काळात विज्ञान व संशोधनासाठी एक टक्का बजेट ठेवले होते. आपले पंतप्रधान दरवर्षी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये जाऊन हे बजेट २ टक्के करण्याचे वक्तव्य करतात, त्यांना टाळ्याही मिळतात पण दुर्दैवाची बाब म्हणजे हेच बजेट एकवरून ०.६ टक्केवर पोहचले आहे. चीन यापेक्षा कितीतरी पट समोर आहे. यामुळे भारताचा विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधनासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा डोलारा कोसळल्याची टीका त्यांनी केली. भारतामध्ये प्रचंड क्षमता असूनही राजकीय नेतृत्वामुळे रोजगार निर्मिती, विकास दर वाढविण्यात अपयशी ठरलो आहोत, अशी टीका करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.