कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:07 AM2021-04-03T04:07:22+5:302021-04-03T04:07:22+5:30
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. दुसरी लाट अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. शुक्रवारी पुन्हा रुग्णसंख्येचा नवा विक्रम ...
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. दुसरी लाट अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. शुक्रवारी पुन्हा रुग्णसंख्येचा नवा विक्रम स्थापन झाला. ४१०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, शिवाय सलग दुसऱ्या दिवशी ६० रुग्णांचे बळी गेले. धक्कादायक म्हणजे, पहिल्यांदाच शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक मृत्यू झाले. शहरात २७, तर ग्रामीणमध्ये ३० रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या २,३३,७७६, तर मृतांची संख्या ५,२१८ झाली आहे.
कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात पहिली लाट असताना, म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी २४३४ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर २६ मार्च रोजी ४०९५ इतकी उच्चांकी नोंद झाली. रुग्णसंख्येचा हा विक्रम शुक्रवारी मोडीत निघाला. नागपूर जिल्ह्यात १७,०९० चाचण्या झाल्या. यात १३,३८४ आरटी-पीसीआर, तर ३,७०६ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटी-पीसीआरमधून ३९३२ रुग्ण, तर अँटिजेन चाचणीतून १७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३२१४ बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,८७,७५१ झाली. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ८०.३१ टक्के आहे.
- शहराचा मृत्युदर १.८० टक्के, ग्रामीणचा २.१० टक्के
शहरात शुक्रवारी २८५७, तर ग्रामीणमध्ये १२४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत शहरात १,८२,८९८ रुग्णांची नोंद व ३,३१० बाधितांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये ४९,८३५ रुग्ण आढळून आले व १०४७ बाधितांचे जीव गेले. एकूणच शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील मृत्युदर अधिक आहे. शुक्रवारी हा दर २.१० टक्के होता. शहराचा मृत्युदर १.८० टक्के होता, तर नागपूर जिल्ह्याचा मृत्युदर २.२३ टक्के होता.
- शहरात कोरोनाचे २८,९९६, ग्रामीणमध्ये ११,८११ सक्रिय रुग्ण
नागपूर जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ४०,८०७ झाली आहे. यातील शहरात २८,९९६, तर ग्रामीणमध्ये ११,८११ रुग्ण आहेत. ३१,४२० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ९३८७ रुग्ण शासकीय तसेच विविध रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. ६०१ रुग्ण उपचार घेत आहेत. मेयोमध्ये ५१५, तर एम्समध्ये ६० रुग्ण आहेत.
:: रुग्णसंख्येचा उच्चांक
१७ सप्टेंबर : २४३४ रुग्ण
१६ मार्च : २५८७ रुग्ण
१७ मार्च : ३३७० रुग्ण
१८ मार्च : ३७९६
२६ मार्च : ४०९५
०२ एप्रिल : ४१०८
कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या: १७,०९०
ए. बाधित रुग्ण :२,३३,७७६
सक्रिय रुग्ण : ४०,८०७
बरे झालेले रुग्ण :१,८७,७५१
ए. मृत्यू : ५२१८