नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईचा नवा संकल्प ‘एक ओंजळ तुमचीही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:24 AM2018-01-06T10:24:18+5:302018-01-06T10:32:16+5:30
शिक्षणात ‘हुश्शार’ असूनही आर्थिक बाबींमुळे पुढील शिक्षणासाठी असंख्य विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. अक्षरश: अर्ध्यावरच अनेकांना शिक्षणातून माघार घ्यावी लागते. अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अशा होतकरू, गरजू विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या शिवस्रेह गणेशोत्सव मंडळाने आता कंबर कसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षणात ‘हुश्शार’ असूनही आर्थिक बाबींमुळे पुढील शिक्षणासाठी असंख्य विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. अक्षरश: अर्ध्यावरच अनेकांना शिक्षणातून माघार घ्यावी लागते. अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अशा होतकरू, गरजू विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या शिवस्रेह गणेशोत्सव मंडळाने आता कंबर कसली आहे. ‘एक ओंजळ तुमचीही’ असे त्यांनी या संकल्पाला नाव दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नवीन वर्षात, नवीन संकल्प करणारी उमरेडची ही तरुणाई आता सामाजिक कार्यासाठीही हातभार लावणार आहे. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात लक्षवेधी ठरणाऱ्या उमरेडमध्ये सामाजिक दायित्वाची ही नव संकल्पना या नगरीला नवा आयाम देणारी ठरेल, असा आत्मविश्वास व्यक्त होत आहे. मंडळातील पदाधिकारी - सदस्यांसह उमरेडकरांचाही यात मौलिक वाटा असावा याकरिता ‘एक ओंजळ तुमचीही’ अशी हाक दानपेटीच्या माध्यमातून दिल्या जात आहे.
स्तुत्य उपक्रम
हा उपक्रम रुपचंद गोविंदानी, सुधाकर खानोरकर, अशोक मने, अनिल गोविंदानी, अनिल खानोरकर, डॉ. अशोक शेंदरे, रामभाऊ चाचरकर, अभय लांजेवार, अक्षय खानोरकर आदींच्या मार्गदर्शनात प्रारंभ करण्यात आला. यासाठी राहुल मने, क्षितिज खानोरकर, वैभव भिसे, अनुप शेंदरे, अनंता बावणे, रोशन पाटील, अनिकेत खानोरकर, विक्रम गोविदांनी, जितेंद्र पलांदूरकर, निशांत ताजणे, गोलू जैस्वानी, विक्की लधवे, रिजवान अली सय्यद, रोहित पारवे, मयंक गोडवानी, समीर मने, प्रतीक बेगानी, मृणाल मने, अभिषेक अड्याळवाले, राजू ढेबूदास, गणेश मांढरे, दिनेश ढेबूदास, अर्जून पलांदूरकर, अश्विन कावरे, कृष्णा मुंधडा आदी उमरेडकर तरुणाई सहकार्य करीत आहेत.