'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 11:28 AM2021-12-30T11:28:07+5:302021-12-30T11:41:10+5:30
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत.
नागपूर :ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या वाढत्या धोक्यासोबतच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत.
राज्य शासनाने जमावबंदीचा घेतलेला आदेश लक्षात घेता नागपूरमध्ये देखील रात्री नऊ ते सकाळी सहा जमावबंदी लागू करण्याचे यावेळी एकमताने ठरले. रात्री ९ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद होईल. मॉल- रेस्टॉरेंट, चित्रपटगृह रात्री ९ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरू राहण्यास परवानगी राहील. तसेच बृहन्मुबई महानगरपालिका यांनी निर्गमित केलेल्या आदेशाच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातदेखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण ) विजय मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.
नागरिकांनी या परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत सहकार्य करावे. मास्कशिवाय व गरजेशिवाय बाहेर पडू नये. प्रशासनाच्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. तसेच या आणीबाणीच्या परिस्थितीत कोविड वॉर्ड पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.
फार्म हाऊस, हाऊसिंग सोसायटीमध्येही कार्यक्रम नाही
प्रशासनाने स्पष्ट केले की, सार्वजनिक ठिकाणी किंवा फार्महाऊस, हाउसिंग सोसायटी सारख्या खासगी ठिकाणीसुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करता येणार नाही. डीजे व डांस फ्लोरवरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत हॉटेल-रेस्टारंट रात्री नऊ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील.
असे आहेत दिशा- निर्देश
- जमावबंदी रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत
-दुकाने-मॉल रात्री नऊ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह
- सिनेमागृह, नाट्यगृह शेवटचा शो रात्री नऊ वाजता ५० टक्के क्षमतेसह
- रेस्टॉरंट, उपहारगृहे रात्री नऊ पर्यंत ५० टक्के क्षमतेने
- क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रात्री नऊ वाजेपर्यंत असतील
- व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, योगा सेंटर रात्री नऊ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमता
- आंतरजिल्हा प्रवास - नियमितपणे
- शाळा, महाविद्यालये - शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सुरू राहतील
- कोचिंग क्लासेस - रात्री नऊ वाजेपपर्यंत. विद्यार्थी संख्या १०० पेक्षा जास्त असू नये
- धार्मिक स्थळे - रात्री नऊ वाजेपर्यंत, एका वेळी १०० पेक्षा अधिक लोक असू नये
- सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू असेल; मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही.
- अम्युझमेंट व वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने, कमाल मर्यादा १०० ठेवून सुरू राहतील.
ग्रंथालय, अभ्यासिका रात्री नऊ वाजेपर्यंत १०० कमाल मर्यादेत सुरू राहतील.
- लग्नात १००, अंत्ययात्रेत ५० लोक
विवाह सोहळ्यांमध्येदेखील बंदिस्त जागेसाठी १०० आणि खुल्या जागेत २५० लोकांची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी ५० व्यक्तींची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, मेळावा यांनादेखील रात्री नऊ वाजेपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. बंदिस्त जागेच्या ५० टक्के उपस्थितीत हे कार्यक्रम घेता येतील. तथापि, या कार्यक्रमाची कमाल मर्यादा १०० पेक्षा अधिक असता कामा नये. खुल्या जागेवर हे कार्यक्रम होत असल्यास क्षमतेच्या २५ टक्के मात्र २५० पेक्षा अधिक संख्या असता कामा नये. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुकांसाठी १०० लोकांची मर्यादा बंदिस्त जागेसाठी व २५० लोकांची मर्यादा खुल्या जागेसाठी निर्धारित करण्यात आली आहे.