तालिबानची नवी भूमिका, महिला प्राध्यापिकांना काम करण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 12:14 PM2021-08-19T12:14:02+5:302021-08-19T12:15:33+5:30
Nagpur News आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येण्याची शक्यता लक्षात घेता तालिबानने काहीशी पुरोगामी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अफगाणिस्तानमधील बहुतांश भाग तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न तणावात असलेल्या विद्यार्थिनी व महिलांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येण्याची शक्यता लक्षात घेता तालिबानने काहीशी पुरोगामी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. (A new role for the Taliban, allowing female professors to work)
लोकमतने तालिबानचा ताबा असलेल्या काही विद्यापीठांतील शिक्षणतज्ज्ञांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्वच विद्यापीठांतील विद्यार्थ्यांमध्ये सद्य:स्थितीत प्रचंड तणाव आहे. तालिबानने सर्वच प्रांतांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर विद्यार्थिनींचे शिक्षण त्यांच्या मागील शासनकाळाप्रमाणे बंद होणार का, हाच प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कंधार विद्यापीठाप्रमाणे हेरात विद्यापीठात इस्लामिक एमिरेट्सच्या उच्च शिक्षण आयुक्तालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेतील समन्वयानंतर झालेल्या निर्णयांची हेरात विद्यापीठाचे प्रमुख डॉ. मोहम्मद दाऊद मुनिर यांनी घोषणा केली. महिला प्राध्यापिका व कर्मचाऱ्यांना हिजाब घालूनच कामावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वर्ग लवकरच सुरू करण्याची तयारी करा, अशी सूचना त्यांनी केली. हेरात विद्यापीठातील निर्णय इतर विद्यापीठे व शाळा-महाविद्यालयांसाठीदेखील लागू करण्यात येतो का, याकडे अफगाणिस्तानातील महिलांचे लक्ष लागले आहे.
जुन्या शासनकाळातील चुका टाळा
हेरात विद्यापीठातील सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार १६ ऑगस्ट रोजी तालिबानचे प्रतिनिधी व विद्यापीठातील अधिकाऱ्यांची उच्च शिक्षण धोरणासंदर्भात चर्चा झाली. तालिबानने जुन्या शासनकाळातील चुका टाळल्या पाहिजेत. अफगाणिस्तानमधील विद्यार्थिनींची कामगिरी विद्यार्थ्यांपेक्षा चमकदार झाली आहे व त्यांच्याकडून शिकण्याची संधी हिरावून घेणे अयोग्य ठरेल, असे स्पष्ट मत डॉ. मुनिर यांनी या बैठकीत मांडले.
तालिबानकडून उच्चशिक्षणासाठी स्वतंत्र कार्यालय
या बैठकीदरम्यान मौलवी नूरूलहक मुजाहिरी यांनी तालिबानची भूमिका स्पष्ट केली. उच्च शिक्षणासंदर्भात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. इस्लामिक एमिरेट्सकडून महिलांच्या शिक्षणावर बंधने आणण्यात येणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती हेरात विद्यापीठातील सूत्रांनी लोकमतला दिली.