नव्या सत्राची सुरुवात ऑनलाईन क्लासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:21+5:302021-06-26T04:07:21+5:30
नागपूर : विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहे. परंतु विद्यार्थी घरीच राहणार असून, शाळांची सुरुवात ऑनलाईन क्लासने होणार ...
नागपूर : विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहे. परंतु विद्यार्थी घरीच राहणार असून, शाळांची सुरुवात ऑनलाईन क्लासने होणार आहे. आता शिक्षकांना ऑनलाईन क्लाससंदर्भातील अहवालही विभागाला सादर करावा लागणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पहिल्यांदाच दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. वर्गात न जाता व परीक्षा न देता विद्यार्थी वरच्या वर्गात पोहचले आहेत. दरम्यान विदर्भ वगळात राज्यातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या असून २८ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होणार आहेत. मात्र अद्याप शाळा कशा पद्धतीने सुरू होणार याची शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उत्सुकता लागली आहे. शिक्षण विभागाने शाळांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना शाळांत बोलावू नये याशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाईन व इतर उपक्रमाच्या माध्यामातून शिकवावे असे नमूद केले आहे. त्यामुळे शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. तथापि, शिक्षकांना शाळेत जावे लागणार आहे. येथूनच ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतील असे सध्याचे तरी नियोजन दिसून येते. विशेष म्हणजे सत्राच्या पहिल्या दिवसापासून याचे नियोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे.
- शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना
शिक्षण विभागाने शाळांना पाठविलेल्या पत्रानुसार, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. १० वी व १२ वीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, वर्ग १ ते ९ च्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.