रंजनकुमार शर्मा सीआयडीचे नवे अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:00 IST2019-02-25T23:57:55+5:302019-02-26T00:00:29+5:30
तब्बल चार वर्षे नागपुरात विविध पदांवर काम करणारे आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रंजनकुमार शर्मा यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. ते आता गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यातील अधीक्षक, महानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात शर्मा यांचीही बदली करण्यात आली.

रंजनकुमार शर्मा सीआयडीचे नवे अधीक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल चार वर्षे नागपुरात विविध पदांवर काम करणारे आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रंजनकुमार शर्मा यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. ते आता गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यातील अधीक्षक, महानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात शर्मा यांचीही बदली करण्यात आली.
भारतीय पोलीस सेवेतील २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शर्मा २०१२ मध्ये यवतमाळला पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर ते तेथून राज्य राखीव दलाचे कमांडंट म्हणून नागपुरात बदलून आले. तेथून त्यांची २०१५ मध्ये शहरात पोलीस उपायुक्त इमिग्रेशन म्हणून बदली झाली. तीन महिन्यानंतर त्यांना गुन्हे शाखेची (डिटेक्शन) जबाबदारी देण्यात आली. अनेक मोठमोठी प्रकरणे त्यांनी उघड करून कुख्यात गुंडांना अटक केली. २०१७ मध्ये ते नागपुरातून बदलून अहमदनगरला गेले. तेथे त्यांनी दोन वर्षांत अनेक चांगल्या कामगिरी केल्या. पारधी समाजातील ५०० मुलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. अनेक वर्षांपासून पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा कुख्यात गुन्हेगार चण्या बेग याला अटक करण्याची कामगिरीही त्यांनी बजावली. आता ते सीआयडीचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. शुक्रवारपर्यंत आपण नागपुरात येऊन पदाची जबाबदारी सांभाळू, असे ते लोकमतशी बोलताना म्हणाले.