चॅनेलच दिसेना, सिरिअल कशा पाहायच्या? प्रेक्षक निराश, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:16 PM2023-02-21T15:16:49+5:302023-02-21T15:17:11+5:30
तीन महत्त्वाच्या चॅनेलचे प्रक्षेपणच बंद
नागपूर : सोनी, स्टार, झी या मनोरंजन क्षेत्रातील देशातील महत्त्वाच्या चॅनेलनी मासिक दरवाढीसाठी देशात कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद केल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे. चॅनेल केव्हा सुरू होतील, यावर भाष्य करता येणार नसल्याचे केबल ऑपरेटर्सचे मत आहे. मात्र, आवडत्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद असल्यामुळे महिलांचे मनोरंजनाचे हक्काचे माध्यम हिरावले आहे.
मराठी आणि हिंदी कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद असल्यामुळे तीन दिवसांपासून दिवस आणि सायंकाळचा वेळ जात नाही, अशी महिलांची तक्रार आहे. कार्यक्रम बंद असल्यामुळे मालिकेतील सातत्य तुटले आहे. चॅनेल कंपन्यांनी मासिक दर किती वाढवायचे, यावर तातडीने निर्णय घेऊन कार्यक्रमांचे प्रक्षेपण तातडीने सुरू करावेत, अशी मागणी काही महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
स्टार आणि झी टीव्हीवरील मालिका नित्यनेमाने बघतो; पण तीन दिवसांपासून चॅनेलचे प्रक्षेपण बंद असल्यामुळे तीन दिवसात मालिकेत काय घडले, याची उत्सुकता लागली आहे. तसेच सोनी टीव्हीवर आवडती हिंदी मालिका बघता येत नसल्यामुळे निराश आहे.
- ममता वैरागडे, गृहिणी
दररोज स्टार, झी, सोनी, कलर्स या चॅनेलवर हिंदीच मराठी मालिका पाहतो. सायंकाळ व रात्री मालिका न बघितल्यास पुनर्प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी दुपारी बघतो. तीन दिवसांपासून तीन महत्त्वाच्या चॅनेलने प्रक्षेपण बंद केले आहे. महिलांना मनोरंजनापासून वंचित करू नये.
- विद्या समर्थ, गृहिणी.
तीन दिवसांपासून टीव्ही चॅनेलचे प्रेक्षपण बंद असल्यामुळे खरोखरंच निराश आहे. कलर्स चॅनेल सुरू आहे; पण आवडीची मालिका झी मराठी चॅनेलवर बघते. त्यामुळे वारंवार या चॅनेलचे बटण दाबले जाते. चॅनेलने प्रक्षेपण लवकरच सुरू करावे.
- वर्षा बावणे, गृहिणी.
आता बस्सं झालं, झी व स्टार टीव्हीने मालिकांचे प्रसारण लवकरच सुरू करावे. महिलांचा दुपारचा वेळ मालिकांमुळे जातो. त्यांना किती दर वाढवायचे, यावर चर्चा करून ही समस्या तातडीने सोडवावी. महिलांचे मनोरंजनाचे माध्यम हिरावू नये.
- पल्लवी गणोरकर, गृहिणी.