नागपुरात १४०० मीटरचा नवीन ‘टॅक्सी-वे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:37 AM2018-04-02T10:37:54+5:302018-04-02T10:38:02+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ३.२५ कि़मी.च्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून १४०० मीटरच्या नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम करण्यात येत आहे.

The new 'taxi-way' of 1400 meters in Nagpur | नागपुरात १४०० मीटरचा नवीन ‘टॅक्सी-वे’

नागपुरात १४०० मीटरचा नवीन ‘टॅक्सी-वे’

Next
ठळक मुद्देएअर इंडियाच्या एमआरओपासून बांधकामाला प्रारंभ १० महिन्यात पूर्ण होणार

मोरेश्वर मानापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ३.२५ कि़मी.च्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून १४०० मीटरच्या नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम २० दिवसांपूर्वीच सुरू झाले असून १० महिन्यात पूर्ण होणार आहे.

४३.५० कोटींची गुुंतवणूक
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) या कामाच्या ई-निविदा दोन महिन्यांपूर्वी काढल्या होत्या. मुंबई येथील आरपीएस इन्फ्रा कंपनीला बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे. ४३ कोटी ५० लाख रुपयांचे कंत्राट आहे. कंपनीने बांधकाम सुरू केले आहे. मिहानमध्ये एअर इंडियाच्या एमआरओलगत इंदमार एमआरओचे दोन हँगर जूनमध्ये तयार होणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम कंपनीला पूर्ण करायचे आहे. इंदमार एमआरओच्या बाजूला अनिल अंबानी यांचा धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्क उभा राहणार आहे. १४०० मीटरचा ‘टॅक्सी-वे’ पार्कपर्यंत राहील. नवीन दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखभाल व दुरुस्तीसाठी येणाऱ्या विमानांची संख्या वाढणार असून हँगरमध्ये विमान ठेवण्यासाठी जागा राहणार नाही. ही शक्यता ओळखून १४०० मीटरच्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून विमानांच्या पार्किंगसाठी एमएडीसी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकूण ४.६५ कि़मी.चा ‘टॅक्सी-वे’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ‘एमएडीसी’ने जवळपास ३.२५ कि़मी.चा ‘टॅक्सी-वे’ची उभारणी पूर्वीच केली आहे. एअर इंडियाचे विमान दुरुस्तीसाठी विमानतळापासून थेट एमआरओमध्ये येत आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंगच्या २५ विमानांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या शिवाय एअर इंडियाने विमानांच्या दुरुस्तीसाठी स्पाईस जेट या विमान कंपनीशी करार केला आहे. यानुसार या कंपनीच्या दोन विमानांची दुरुस्ती एमआरओमध्ये होत आहे. एअर इंडिया अन्य कंपन्यांशी करार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या एमआरओमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या विमानांची संख्या वाढणार आहे.
मिहान प्रकल्पात विमानाचे देखभाल आणि दुरुस्ती केंद्र (एमआरओ) उभारण्यासाठी देशविदेशातील कंपन्यांकडून विचारणा होऊ लागली आहे. मिहानमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आहेत. एम्स प्रकल्पापुढील रस्ता चार पदरी करण्यात येत असून ७.५ कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The new 'taxi-way' of 1400 meters in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.