‘उमरेड कऱ्हांडला’त दिसून आले नवीन वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:01 AM2020-09-21T10:01:21+5:302020-09-21T10:01:40+5:30
वनअधिकाऱ्यांनुसार पावसाळ्याचे दिवस असल्याने उमरेड-पवनी कऱ्हांडला अभयारण्यात अन्य वन क्षेत्रातील वाघांचेही स्थलांतरण होत आहे. वनक्षेत्रात लागून असलेले कॅमेरेही याची साक्ष देताहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सध्या नवीन वाघांची उपस्थिती दिसून आली आहे. वन अधिकाऱ्यांनुसार पावसाळ्याचे दिवस असल्याने उमरेड-पवनी कऱ्हांडला अभयारण्यात अन्य वन क्षेत्रातील वाघांचेही स्थलांतरण होत आहे. वनक्षेत्रात लागून असलेले कॅमेरेही याची साक्ष देताहेत.
प्रत्येक सोमवारी वन कर्मचारी कॅमर ट्रॅपची तपासणी करतात. या तपासणीत काही कॅमेऱ्यांमध्ये नवीन वाघ दिसून आलेत. यात वाघ आणि वाघीण या दोघांचाही समावेश आहे. यासोबतच कुही वन परिक्षेत्रात ब्रह्मपुरीचा वाघ टी -२२ सुद्धा पाहिला गेला आहे. त्यामुळेच १२ सप्टेंबर रोजी जेव्हा मृत वाघ आढळून आला तेव्हा ते वाघांच्या आपसातील लढाईत मारला गेल्याचे मानले जात आहे. मृत २ वर्षीय वाघ हा अभयाारण्याती वाघीन टी-१७ च्या तीन छाव्यांपैकी एक असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वन अधिकाऱ्यानी वाघांची उपस्थिती असलेल्या ठिकाणी कॅमरा ट्रॅप वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
कॅमेराही चोरीला
कऱ्हांडला वन्यजीव परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १४१८ मधून एक कॅमेरा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कॅमेऱ्याची किमत १० हजार रुपये आहे. वन्यजीव क्षेत्रातील कॅमरा चोरी गेल्याने सुरक्षा व्ययवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांच्या कॅमेऱ्यासमोरून जाताच फ्लॅशसह फोटो निघतो. त्यामुळे काही प्राणी कॅमेऱ्याला हलवून ते काढण्याचा प्रयत्नही करतात. यापार्श्वभूमीवर न कर्मचारी गस्त घालतांना वनक्षत्रातील कॅमऱ्यावरही नजर ठेवतात. १५ सप्टेंबर रोजी कॅमेरा दिसून न आल्याने विभागीय चौकशीनंतर उमरेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.