नवीन कामाचे कार्यादेश थांबविले
By admin | Published: June 24, 2015 02:54 AM2015-06-24T02:54:48+5:302015-06-24T02:54:48+5:30
आर्थिक स्थिती बिकट असल्याने व तिजोरीत पैसा जमा होण्याची गती संथ झाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन कार्यादेश देण्याचे थांबविले आहे.
महापालिका : आर्थिक संकटामुळे निर्णय
नागपूर : आर्थिक स्थिती बिकट असल्याने व तिजोरीत पैसा जमा होण्याची गती संथ झाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन कार्यादेश देण्याचे थांबविले आहे.
मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २०० कोटींची बिले प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी वित्त विभागाने यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना अवगत केले आहे. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच्या दोन महिन्यापर्यंत अपेक्षेच्या तुलनेत ९० कोटींचे उत्पन्न कमी झाले. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. नियमित होणारी आवक घटली आहे. याचा विचार करून आयुक्तांनी १२९४.७५ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. त्यानुसार अर्थसंकल्पापूर्वी एप्रिल व मे महिन्यात २१५.७९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात १२४.२४ कोटींचा महसूल जमा झाला. दुसरीकडे दर महिन्याच्या खर्चात वाढ झाली असून, हा खर्च ६५ वरून ६८ कोटींवर गेला आहे.
मनपातील कंत्राटदारांची १५० कोटींची बिले प्रलंबित असल्याची माहिती कंत्राटदार संघटनेचे विजय नायडू यांनी दिली. दुसरीकडे लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या मते, ५० कोटींची बिल देणे आहे. आवक घटल्याने काही दिवस नवीन कार्यादेश थांबविण्यात आले आहे.
वेतन देण्यालाही विलंब होत असल्याची कबुली हर्डीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)