पक्षामध्ये असलेल्या नवीन कार्यकर्त्यांना जुना इतिहास माहीत नसतो- नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:42 PM2020-02-29T17:42:59+5:302020-02-29T17:43:19+5:30
जनसंघाच्या काळापासून अतिशय कठीण परिस्थिीतत पक्ष संघटन वाढविण्यासोबत कार्यकर्ता तयार करण्याचे काम सुमतीताईंनी केले आहे.
नागपूर: पक्षामध्ये असलेल्या नवीन कार्यकर्त्यांना जुना इतिहास माहीत नसतो त्यामुळे तो काळ विस्मरणात जातो. जनसंघाच्या काळापासून अतिशय कठीण परिस्थिीतत पक्ष संघटन वाढविण्यासोबत कार्यकर्ता तयार करण्याचे काम सुमतीताईंनी केले आहे. ज्या भागात आम्हाला निवडणुकीच्या काळात दगड खावे लागायचे तेथे आता आम्ही विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत आहोत. या स्थितीला आज ताईचे कार्य महत्त्वाचे आहे. सामाजिक सेवेचा वसा त्यांनी घेतला होता. पक्षाला जे काही यश मिळत आहे त्यात ताईंचा वाटा मोठा असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भाऊराव देवरस प्रतिष्ठान, बालजगत व सुमतीताई सुकळीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यकर्ता गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक भैय्यासाहेब मुंडले यांना कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला दीनदयाल शोध संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, जगदीश सुकळीकर, माजी न्या. मीरा खडक्कार, सुहासिनी मुंडले, विवेक तरासे उपस्थित होते.