नागपुरात नवा जागतिक विक्रम प्रस्थापित
By admin | Published: July 11, 2016 02:38 AM2016-07-11T02:38:23+5:302016-07-11T02:38:23+5:30
नागपुरातील डॉक्टर फॉर फार्मर्सच्या चमूने शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या २९५ डॉक्टरांना एकत्र करून रविवारी
डॉक्टरांचा पुढाकार : रेकॉर्डब्रेक होताच साजरा केला आनंदोत्सव
नागपूर : नागपुरातील डॉक्टर फॉर फार्मर्सच्या चमूने शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या २९५ डॉक्टरांना एकत्र करून रविवारी सकाळी ९.३० वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर एकमेकांना तपासून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रेकॉर्ड होताच डॉक्टरांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.
डॉक्टर्स फॉर फार्मर्सच्या चमूतील डॉ. संजय दाचेवार, डॉ. सूरज करवाडे, डॉ. पृथा कोसे, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल करवंदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय, श्री आयुर्वेदिक कॉलेज, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कृष्णराव पांडव आयुर्वेदिक महाविद्यालय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय, ज्युपिटर आयुर्वेदिक महाविद्यालय, लता मंगेशकर मेडिकल कॉलेज, व्हीएसपीएन डेन्टल कॉलेज, काळमेघ डेन्टल कॉलेजच्या डॉक्टर, प्राध्यापकांना एकत्र केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर २९५ डॉक्टर एकामागे एक लांब शृंखलेत उभे झाले. त्यांनी एकमेकांच्या पाठीला स्टेथास्कोप लावून अमेरिकेचा रेकॉर्ड मोडला. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे २७४ डॉक्टरांची साखळी तयार करून एकमेकांना स्टेथास्कोपच्या साह्याने तपासण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करून गिनीज वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद केली होती.
नागपुरात हा रेकॉर्डब्रेक करून डॉक्टरांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी निरीक्षक म्हणून वसंत झाडे, अंजू चोपडा, गौरी रंगनाथन, भारतीय कृष्ण विद्या विहारच्या नागलक्ष्मी उपस्थित होत्या. या रेकॉर्डची इंडिया बुक रेकॉर्डला नोंद झाली असून यातील महत्त्वाचे पुरावे, चित्रीकरण या सर्व बाबी गिनीज वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डकडे पाठविल्यानंतर या विक्रमाची नोंद जागतिक पातळीवर होणार आहे.(प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत
रेकॉर्ड करण्यापूर्वी आयोजित एका समारंभात आत्महत्या करणाऱ्या पाच शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी सात हजाराचा धनादेश देण्यात आला. यात चंदन पवार, स्नेहल गुल्हाने, आकाश हळदे, पवन हळदे, विश्वजित देशमुख यांना ही मदत करण्यात आली. कार्यक्रमाला शिक्षक आमदार नागो गाणार, अमिताभ पावडे, प्राचार्य अनिल करवंदे, डॉ. संजय दाचेवार उपस्थित होते. यावेळी आ. नागो गाणार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची घोषणा केली. तसेच प्राचार्य डॉ. अनिल करवंदे, डॉ. केशव भगत, शारदा बत्तुलवार यांनीही प्रत्येकी एक मुलगा दत्तक घेण्याची घोषणा केली.