नवीन वर्षाचे स्वागत फटाके फोडून करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 10:04 PM2020-12-28T22:04:51+5:302020-12-28T22:08:53+5:30
New Year ,No fireworks , nagpur news नवीन वर्षाचे स्वागत करताना नागपूर महानगर व जिल्ह्यात प्रतिबंधित आणि शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली. सोबतच या काळासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षाचे स्वागत करताना नागपूर महानगर व जिल्ह्यात प्रतिबंधित आणि शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली. सोबतच या काळासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला फटाक्याच्या लडी, अधिक आवाज करणारे फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
नूतन वर्ष साजरा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लोक मोठ्या प्रमाणात फटाके उडवितात व फोडतात. यामुळे रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक हिताच्या आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ जानेवारी २०२१ पर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जिल्ह्यात लागू केले आहे.
शहरातील पेट्रोल पंप, सिलेंडर, गोडाऊन, केरोसीन तेलाचे डेपो, फटाक्याची दुकाने, ज्वालाग्राही पदार्थांचे डेपो, रासायनिक पदार्थांचे डेपो, दुकाने वस्ती अथवा बाजारपेठेत या सर्व ठिकाणी २०० फुटाचे आत फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा, फटाके उडविण्याचे जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत ११० ते ११५ डेसिबलपेक्षा जास्त होता कामा नये. शाळा-कॉलेज, रुग्णालय, न्यायालय इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोनमध्ये येतात. त्या भागात १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई आहे. हरित लवादाच्या आदेशानुसार ग्रीन फटाके वगळता इतर सर्व प्रकारचे फटाके विकणे, फोडणे व उडविणे यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
मनपा क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली संचारबंदी मनपा क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत राहील. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू राहील. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल.