नववर्षाचे सेलिब्रेशन जल्लोषात!
By admin | Published: January 1, 2015 01:25 AM2015-01-01T01:25:42+5:302015-01-01T01:25:42+5:30
फुटाळा तलावावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पोलिस-नागरिक सहकार्याने नववर्षाच्या स्वागतासाठी आ. प्रकाश गजभिये यांनी आॅर्केस्ट्राचे आयोजन केले होते. आपल्या कुटुंबासह
उपराजधानीत उत्साह : हॉटेल्स बार हाऊसफुल्ल
उत्फुल्ल तरूणाईने फुलला फुटाळा
नागपूर : फुटाळा तलावावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पोलिस-नागरिक सहकार्याने नववर्षाच्या स्वागतासाठी आ. प्रकाश गजभिये यांनी आॅर्केस्ट्राचे आयोजन केले होते. आपल्या कुटुंबासह अनेक लोक येथे नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी एकत्रित आले. नागपुरात जवळपास पाच हजार लोक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकत्रित झाल्याचे फुटाळा तलाव हे एकमेव सार्वजनिक ठिकाण होते. आॅर्केस्ट्राच्या गीतावर तुफान ताल धरीत युवक - युवतींनी येथे नृत्याचा धमाल आनंद घेतला. यात युवतींचाही लक्षणीय सहभाग होता. बारा वाजल्यावर सर्वांनीच सामुहिक गीत गाऊन नृत्याचा आनंद घेत नव्या वर्षाचे स्वागत केले. त्यानंतर मात्र लागलीच पोलिसांनी सर्वांनाच सक्तीने घरी जाण्याची विनंती केली. थोडा वेळ थांबू देण्याची विनंती अनेक युवक-युवती पोलिसांना थोडा वेळ थांबू देण्याची विनंती करीत होते पण पोलिसांनी नकार दिला. याप्रसंगी उत्फुल्ल तरुणाईने फुटाळा फुलला होता. अनेक मित्रमैत्रिणी येथे रात्री बारापर्यंत एकमेकांचा हात हातात घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करीत होते. याप्रसंगी आ. प्रकाश गजभिये यांनी सर्व उपस्थित युवकांना वही आणि पेन भेट म्हणून दिला. डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाचा मंत्र दिला त्यामुळे प्रतिकात्मक स्वरुपात त्यांचा हा संदेश युवकांपर्यंत नेण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या संकल्पात चांगली भर पडावी म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविला.
बच्चे कंपनीने केली ‘कोल्ड ड्रिंक पार्टी’
नव्या वर्षाचे स्वागत करताना सारेच मोठे लोक आपापल्या तालात असतात. त्यात यंदा शालेय मुलांनीही बाजी मारली. काहीही झाले तरी आम्हीही पार्टी करणारच, असा हट्टच मुलांनी धरल्याने पालकांनीही त्यांना संमती दिली. त्यामुळे मानेवाडा रोड, हनुमाननगर, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, सुभाषनगर, रामनगर, वर्धमाननगर, जरिपटका, इंदोरा आदी अनेक भागात बच्चे कं पनीची पार्टी अपार्टमेन्टच्या टेरेसवर रंगली होती. यात ‘मॅगी’ हा पदार्थ केंद्रस्थानी होता.
याला मुलांनी मॅगी पार्टी असे नाव दिले होते. याशिवाय आवडते ‘कोल्ड ड्रिंक्स’ या पार्टीत मुलांनी पालकांच्या मागे हट्ट करून बोलाविले होते. मुलांच्या या मॅगी पार्टीत मसालेभात आणि नॉनव्हेजसह काही मोठी मंडळीही सहभागी झाली होती.
युवतींनीही केले स्वागत
एरवी युवतींही न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये मागे नव्हत्या. युवतींनी टेरेसवर डी. जे. नाही पण घरातलीच अत्याधुनिक ध्वनीव्यवस्था केली होती. यावर नवनवी गीते लावून युवतींनी तुफान नृत्याचा फेर धरला. यात मुलींशिवाय इतरांना कुणालाही प्रवेश नव्हता. ‘कोल्ड ड्र्ंिक्स’ आणि ‘पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, दाबेली’ याशिवाय काही ठिकाणी कच्चा चिवडा आदी पदार्थांनी युवतींची पार्टी रंगली होती. रवीनगर, वर्धमाननगर, रामदासपेठ, गोकुळपेठ, लक्ष्मीनगर आणि महाल परिसरात युवतींच्या अशा अनेक पार्ट्या रंगल्या होत्या. रात्री बारापर्यंत युवती ध्वनीव्यवस्थेवर तुफान नृत्य करताना पाहून बंदोबस्तावरचे पोलिस त्यांना ध्वनीव्यवस्था बंद करण्याचे आवाहन करीत होते. पण अनेक युवतींनी आजच्या दिवस आम्हाला एकत्र मजा घेऊ द्या, अशी विनंती केली. पण पोलिसांनी नकार देत त्यांना थोडी सवलत दिली. तर गर्ल्स होस्टेलमध्येही डिजेची व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी मुलींनी होस्टेलमध्येच डिजेच्या तालावर नृत्य करुन नवीन वर्षाचे स्वागत केले.
वाईन शॉपवर गर्दी, घरीच रंगमहाल
ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई जोरात करण्याची घोषणा पोलीस प्रशासनाने केल्यामुळे धास्तावलेल्या तळीरामांनी घरीच रंगमहाल करण्याचा बेत आखला. त्यामुळे बिअर बार सोडून अनेकांनी वाईन शॉप गाठले. लगेचच अनेकांनी घराचा रस्ता धरला. यामुळे धरमपेठ, सीताबर्डी परिसरातील वाईन शॉपवर गर्दी होती.
पोलीस आयुक्तांच्या शुभेच्छा
पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी ज्येष्ठ नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक हा देशाचा अनुभवाचा संग्रह असलेला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. येणारे २०१५ मध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत सुखमय व उत्तम स्वास्थ्य लाभो, अशा शब्दात त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
दिवसा भीक मागणारे हात विकत होते फुगे
नववर्षानिमित्त प्रत्येकजण मनाशी काहीतरी संकल्प करतो. कुणी दारु पिणार नाही, कुणी तंबाखू खाणे सोडणार अशा एक ना अनेक शपथ घऊन अनेकजण त्यापासून परावृत्त होतात. परंतु शंकरनगर चौकात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळाच बदल दृष्टीस पडला. दिवसा सिग्नलवर उभे राहून भीक मागणाऱ्या महिला अन् छोटी बालके आज चक्क फुगे विकत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नववर्षानिमित्त त्यांनीही मेहनत करुन पोट भरण्याचा संकल्प केल्याची बाब नजरेत भरली.
वाहतूक पोलिसांकडून गुलाबाचे फूल
वाहतूक पोलीस म्हटलं की हातात पावतीबुक घेऊन सिग्नल तोडला की खिशाला कैची लावणारा व्यक्ती. अशीच वाहतूक पोलिसांची प्रतिमा वाहनचालकांच्या मनात असते. परंतु ही प्रतिमा मोडित काढीत कार्ही चौकात वाहतूक पोलिसांनी नागरिकांना चक्क १ हजार गुलाबाची फुले वाटून त्यांना ‘हॅपी न्यू ईयर विश’ केले. वाहतूक पोलिसांनी सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना गुलाबाचे फुल दिले.