नववर्षाचे सेलिब्रेशन जल्लोषात!

By admin | Published: January 1, 2016 04:45 AM2016-01-01T04:45:49+5:302016-01-01T04:45:49+5:30

रात्री १२ चा ठोका पडला अन् सर्वांनीच जल्लोष करीत एकमेकांना चीअर्स करीत मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या २०१६

New Year Celebration Celebration! | नववर्षाचे सेलिब्रेशन जल्लोषात!

नववर्षाचे सेलिब्रेशन जल्लोषात!

Next

नागपूर : रात्री १२ चा ठोका पडला अन् सर्वांनीच जल्लोष करीत एकमेकांना चीअर्स करीत मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या २०१६ या वर्षाचे दणक्यात स्वागत केले. याप्रसंगी फुटाळा तलाव परिसर युवक-युवतींच्या गर्दीने भरला होता. रात्री १२ वाजता युवक-युवतींनी एकत्रितपणे सामूहिक नृत्याचा फेर धरीत नव्या वर्षाचे स्वागत केले. पब, बार आणि हॉटेल्समध्ये चांगलीच गर्दी झाली होती. पब्स आणि बारमध्ये मद्याने झिंगलेल्या अवस्थेत काहींनी नृत्य करण्याचा आनंद घेतला.
मावळत्या वर्षाला निरोप देताना दरवर्र्षीच तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. तरुणाईच्या थिरकणाऱ्या पावलांनी अनेकदा उन्मादाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते. पण यंदा म्हणावा तसा उन्माद नव्हता. ‘सेलिब्रेशन अ‍ॅण्ड चीअर्स’ होते. पण सारेच हॉटेल्स, पब आणि बारमध्ये. रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती, कारण पोलिसांची कडक नाकाबंदी होती. प्रत्येकाची चौकशी करण्यात येत असल्याने यंदा तरुणाईने रस्त्यावर न येता इनडोअर माहोल करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. साधारणत: प्रत्येक वर्षी सुसाट वेगाने गाड्या पळवणारे युवक, घोषणांचा पाऊस आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा ओरडून देणारे युवक दिसतात. पण यंदा तसे चित्र नव्हते अन् त्यांच्या सेलिब्रेशनचा आरडाओरडाही नव्हता. कुणीही सुसाट वेगाने अंगातला शर्ट काढून बाईक चालविताना दिसले नाही. लॉ कॉलेज चौकापासून लक्ष्मीभुवन चौक, शंकरनगरपर्यंत टोळक्याने फिरणारे युवक-युवतीही यंदा नव्हते. त्यापेक्षा वेगवेगळ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष तुफान बहरला होता. तरुणाईच्या या उन्मादाला गेली काही वर्षे पोलिसांनी चांगलाच लगाम लावल्याने नवीन वर्षाची मजा किरकिरी होऊ नये म्हणून युवकांनी आधीच बंदोबस्त केला.
पोलिसांचा बंदोबस्त पाहता तरुणाईने यंदाही न्यू ईअर सेलिब्रेशन केले, पण ‘इनडोअर’. त्यामुळे मुलामुलींचे ग्रुप्स प्रामुख्याने पिझ्झा रेस्टॉरंट आणि पब्समध्ये एकत्रित आले होते तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये रात्री झिंगलेल्या पार्ट्यांनी रंगत आणली होती. हॉटेल्समध्ये मुंबईचे डीजे...मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री यांची उपस्थिती या पार्ट्यांची रंगत अधिक वाढविणारे होते. हॉटेल्समध्ये युवक-युवतींसाठी काही विशेष खेळांचेही आयोजन करण्यात आले. त्यात नटूनथटून आलेल्या युवती आणि वेगवेगळ्या लुक्समध्ये आलेल्या तरुणांसाठी बेस्ट कपल, बेस्ट ड्रेसिंग आदी विविध स्पर्धांचे आयोजन वातावरण अधिक मदहोश करणारे होते. १२ चा ठोका वाजला अन् फुगे फोडून, बीअर आणि शॅम्पेनच्या बाटल्या उडवून नव्या वर्षाचे धम्माल स्वागत करण्यात तरुणाईने खास पुढाकार घेतला.
न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक बारमालकांनी बार सजविले होते. अनेक बारमध्ये ३१ डिसेंबरसाठी विशेषत्वाने ‘आॅर्केस्ट्रा’ आणि डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक बारमध्ये युवकांना नृत्य करण्यासाठीही केवळ आजच्यापुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे मद्यप्रेमी युवकांनी बारमध्ये प्रामुख्याने गर्दी केली होती. अनेक मित्रमंडळी बारमध्ये मद्याचा आनंद घेत होती. बहुतेक नागरिकांनी मात्र यंदा नव्या वर्षाचे स्वागत करताना घरीच मद्याचा आनंद घेत टीव्ही पाहणे पसंत केले. (प्रतिनिधी)

Web Title: New Year Celebration Celebration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.