नवजात बाळांची विक्री करणारे रॅकेट सापडले; अनाथालय संचालकासह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 01:43 PM2022-05-14T13:43:01+5:302022-05-14T13:45:09+5:30

अनाथाश्रमाचा संचालक सलमुल्ला खान हा या टोळीचा सूत्रधार असल्याने प्रकरण अतिशय गंभीर बनले आहे.

newborn babies selling Racket busted, Four arrested, including orphanage director | नवजात बाळांची विक्री करणारे रॅकेट सापडले; अनाथालय संचालकासह चौघांना अटक

नवजात बाळांची विक्री करणारे रॅकेट सापडले; अनाथालय संचालकासह चौघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देतब्बल तीन वर्षांनंतर खुलासा

नागपूर : नवजात अर्भकांची विक्री करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली असून टोळीचा सूत्रधार असलेल्या अनाथाश्रमाच्या संचालकासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या तावडीत एक बाळ सापडले आहे. अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचे नाव सलमुल्ला खान (६२) असून तो गिट्टीखदान येथील रहिवासी आहे.

सलमुल्ला खान अनेक वर्षांपासून कोंढाळी येथे अनाथाश्रम चालवत होता. खान याने त्याआड नवजात अर्भक विकल्याचा संशय आहे. गिट्टीखदान येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षिका अनेक दिवसांपासून नवजात बाळ दत्तक घेण्याची तयारी करत होत्या. यासंदर्भात शिक्षिकेने धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांशी बोलणे केले. शिक्षिकेने दोन्ही परिचारिकांकडून मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांचीही शिक्षिकेची ओळख खानशी करवून दिली. मुलगा दत्तक देण्याच्या बदल्यात खानने तीन लाख रुपयांची मागणी केली. शिक्षिका तयार झाल्यानंतर खानने बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे तयार करून २०१९ मध्ये ३ लाख रुपयांना नवजात बालक शिक्षिकेकडे सुपूर्द केले. तेव्हापासून शिक्षिका नवजात बालकाची काळजी घेऊ लागली. शिक्षिकेला एक विवाहित मुलगाही आहे. आईच्या या निर्णयाने तो नाराज झाला होता.

त्याने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार गुन्हे शाखेकडे केली. गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास करून महिला शिक्षिकेची चौकशी केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सूत्रधार सलमुल्ला खान आणि त्याच्याशी संबंधित दोन्ही महिला परिचारिकांना अटक करण्यात आली. बेकायदेशीरपणे नवजात दत्तक घेतल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेलाही अटक केली.

अनाथाश्रमाचा संचालक सलमुल्ला खान हा या टोळीचा सूत्रधार असल्याने प्रकरण अतिशय गंभीर बनले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खान अनेक वर्षांपासून कोंढाळी येथे अनाथाश्रम चालवत होता. वर्षभरापूर्वी अनाथालय बंद करण्यात आले. हेराफेरीमुळे अनाथालय बंद पडण्याची भीती आहे. शिक्षिकेला विकलेल्या नवजात बालकाची माहिती पोलिसांना देण्यास खान टाळाटाळ करत आहे. त्याने या पद्धतीने अनेक नवजात बालकांची विक्री केली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

प्रक्रियेमुळे अपत्यहीन जोडपे वळतात गैरमार्गाकडे

अनाथ मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया खूपच किचकट असते. ती पूर्ण करण्यासाठी अपत्यहीन जोडप्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि प्रतीक्षादेखील करावी लागते. त्यामुळे अनेक जोडपी नवजात बालकाला बेकायदेशीरपणे दत्तक घेण्याचे काम करतात. अपत्यहीन जोडप्यांच्या या भूमिकेमुळे नवजात अर्भकांची विक्री करणारे रॅकेट फोफावते. यापूर्वीही असे रॅकेट समोर आले आहेत.

खासगी नर्सिंग होमवर संशय

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही परिचारिका धंतोली येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये काम करत होत्या. या नर्सिंग होमचे नाव यापूर्वीही एका नवजात बाळाच्या विक्रीच्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणामुळे, पोलिसांना खासगी नर्सिंग होम चालकांच्या भूमिकेवरही संशय आहे. शिक्षिकेला दिलेला बनावट जन्म दाखलाही या खासगी नर्सिंग होममधून बनवला जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: newborn babies selling Racket busted, Four arrested, including orphanage director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.