नवजात शिशंूच्या मृत्यूची संख्या होणार कमी!
By admin | Published: February 19, 2017 02:52 AM2017-02-19T02:52:09+5:302017-02-19T02:52:09+5:30
ज्या कुणाचे चिमुकले बाळ जीवन-मरणाशी संघर्ष करीत असेल, आणि त्याला अद्ययावत उपचारापासून वंचित ठेवले जात असले
मेडिकलचा ८० खाटांच्या ‘एनआयसीयू’ साठी पुढाकार : बालरुग्णांवर होणार अद्ययावत उपचार
सुमेध वाघमारे नागपूर
ज्या कुणाचे चिमुकले बाळ जीवन-मरणाशी संघर्ष करीत असेल, आणि त्याला अद्ययावत उपचारापासून वंचित ठेवले जात असले त्या बाळाच्या पालकांची मन:स्थिती कशी असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून पालकांची ही तळमळ मेडिकल रुग्णालय प्रशासनाला कळत असूनही काहीच करता येत नव्हते. अखेर याची गंभीर दखल घेत, ८० खाटांचे स्वतंत्र निओनेटोलॉजी विभाग (एनआयसीयू) सुरू करण्याचा निर्णय घेतला. या विभागामुळे मेडिकलसह बाहेरून येणाऱ्या बालरुग्णांना अद्ययावत उपचार उपलब्ध होऊन नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यातून अतिजोखमीच्या माता प्रसूतीसाठी दाखल होत असतात. मेडिकलमध्ये दरवर्षी साधारणत: १२ ते १५ हजार नवजात बालकांचा जन्म होतो. यातील अतिजोखमीचे १३०० ते १५०० बालरुग्ण दाखल करण्याची वेळ येते. विदर्भात केवळ एकट्या मेडिकलमध्ये आवश्यक यंत्र सामुग्रीसोबतच चार न्यूओलेटर व्हेंटिलेटरची सोय असलेले ‘एनआयसीयू’ आहे. परंतु येथे २० खाटाच आहेत. यामुळे येथे केवळ मेडिकलमध्येच जन्म घेणाऱ्या बालकांना दाखल केले जाते. बाहेरून येणारे बालरुग्ण कितीही गंभीर असले तरी त्यांना सामान्य वॉर्डात ठेवले जाते. येथे आवश्यक सोयी नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. २०१४ मध्ये ४७३, २०१५ मध्ये ८३५ नवजात शिशूंचे मृत्यू झाले आहेत.
गेल्या हिवाळी अधिवेशनात ‘लोकमत’ने हे वृत्त लावून धरले होते. तारांकित प्रश्नही उपस्थित झाला होता. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याची गंभीर दखल घेत ८० खाटांचा ‘एनआयसीयू’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भातील प्रस्ताव डिसेंबर २०१६ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) पाठविला. या विभागाला मंजुरी मिळाल्यास राज्यातील हा पहिला विभाग असणार आहे.
असे असणार ‘एनआयसीयू’
‘एनआयसीयू’ या विभागाची तळमजल्यासह दोन मजल्याची इमारत असणार आहे. गंभीर आजाराच्या नवजात शिशूंसाठी बाह्यरुग्ण विभाग असेल. पहिल्या मजल्यावर मेडिकलमध्ये जन्मलेल्या शिशूंसाठी १० खाटांचा वॉर्ड राहील. याला ‘लेव्हल-३’ असे नाव देण्यात आले आहे. येथे अति गंभीर स्वरूपातील अर्भकांसाठी अतिदक्षता विभाग असेल. या विभागात अद्ययावत जीवन रक्षण प्रणालीची सोय असणार आहे. ‘लेव्हल-२’मध्ये कमी जोखमीच्या अर्भकांवर उपचार केले जातील. यात १८ खाटा व दोन आयसोलेशन खाटा असेल. दुसऱ्या मजल्यावर इतर रुग्णालयातून येणाऱ्या अर्भकांवर उपचारांसाठी ‘लेव्हल-३’, ‘लेव्हल-२’सारखीच कार्यप्रणाली व खाटा असतील. या दोन्ही मजल्यावर १० खाटांचे सामान्य वॉर्डही असतील. मेडिकलच्या वसतिगृह क्र. तीनच्या बाजूला असलेल्या २५ हजार स्केअर फूट जागेवर या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे.