उपचाराअभावी नवजात बाळ दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:18+5:302021-09-24T04:10:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री वाटेतच प्रसुती झाली. नवजात बाळ व त्याच्या आईला लगेच प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. मात्र, तिथे नवजात बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचा मृत्यू याेग्य उपचाराअभावी झाल्याचा आराेप आईसह कुटुंबीयांनी केल्याने तसेच दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
अंजना रवींद्र चाचेरकर (रा. वेलतूर, ता. कुही) यांना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्याने त्यांना वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. त्यावेळी आराेग्य केंद्रात डाॅक्टर अथवा परिचारिका कुणीही नव्हते. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी लगेच दवाखान्याच्या आवारातील निवासस्थानात राहणाऱ्या परिचारिकेला बाेलावले. मात्र, परिचारिका एक तास उशिरा पाेहाेचली. त्या परिचारिका आपल्याशी उर्मटपणे बाेलल्या तसेच मला बाेलवायचे नाही. मला त्रास दिल्यास नागपूरला रेफर करेन, असे सुनावले व निघून गेल्या, असेही महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले.
त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला लगेच नागपूरला रवाना केले. नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता, तिथे नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील हयगय व घडामाेडींमुळे झाल्याचा आराेप कुटुंबीयांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा सहाय्यक आराेग्य अधिकारी डाॅ. हेमके यांनी शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजता वेलतूर आराेग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी बाळाचे कुटुंबीय व आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे जबाब नाेंदवून घेतले. या प्रकरणाची चाैकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
........
वाटेतच झाली प्रसुती
अंजना चाचेरकर यांना वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रात आणल्यानंतर त्यांच्यावर तिथे सुरुवातीला एक तासाने जुजबी उपचाराला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळात परिचारिका निघून गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना नागपूरला हलवले. त्यामुळे बाळाचा वेलतूर-नागपूर दरम्यान वाटेतच मृत्यू झाला. दाेघांनाही नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे काही वेळात नवजात बाळाचा मृत्यू झाला. अंजना चाचेरकर यांच्यावर वेलतूर येथेच उपचार करून तिथे त्यांची प्रसुती झाली असती तर नवजात बाळाच्या जीविताला धाेका उद्भवला नसता, असेही चाचेरकर कुटुंबीयांनी सांगितले.